‘23 रोजी ऊसदरावर तोडगा’

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात 23 रोजी नाशिक येथे होणार्‍या बैठकीत ऊसदराबाबत तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न चर्चेद्वारे सोडविणार असल्याचे ते म्हणाले.

 

शेवगाव गोळीबार प्रकरणातील जखमी शेतकर्‍यांच्या भेटीसाठी मंत्री खोत शुक्रवारी नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गोळीबाराची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्याचा प्राथमिक अहवाल आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकर्‍यांची एफआरपीपेक्षा अधिक उचलीची मागणी होती. यासाठी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. साखर कारखानदार व शेतकरी यांच्यात योग्य चर्चा झाली असती तर ती दुर्दैवी घटना घडली नसती.

 

….आणि त्यांनी हात जोडले!
गोळीबारातील जखमींना भेटण्यासाठी नगरमध्ये आलेल्या मंत्री खोत यांना गर्दीत दोन मजूर भेटण्यासाठी आले. पोलिसांनी अटक केलेल्या शेतकर्‍यांमध्ये दोन शेतकर्‍यांची काहीही चूक नाही. ते किराणा आणण्यासाठी दुकानाकडे निघाले होते. त्यांना पोलीसांनी कोणतीच चौकशी न करता उचलून नेले. आता तुम्हीच त्यांना सोडवा, अशी विनंती त्यांनी हात जोडून ना.खोत यांच्याकडे केली. यावर कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर त्या शेतकर्‍यांची सुटका होईल, असे आश्‍वासन ना. खोत यांनी दिले.

LEAVE A REPLY

*