परप्रांतीयांना जाण्या घरी धावली ‘लालपरी’; रस्त्याने पायी चालणारे २२० परप्रांतीय गावी रवाना

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | मुंबई, ठाणे, नाशिक येथून मुंबई-आग्रा महामार्गाने गावाकडे पायी निघालेल्या परप्रांतीय मजुरांना चांदवड टोलनाका, रेणुका देवी मंदिर येथे थांबविण्यात आले होते. तेथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे या मजुरांना विनामूल्य त्यांच्या प्रांताकडे रवाना करण्यात आले. या बसेसमधील प्रवाशांना चांदवड प्रशासनाकडून बिस्कीट, पिण्याचे पाणी देण्यात आले. काही मजुरांकडे असलेल्या सायकलीदेखील बसच्या टपावर टाकण्यात आल्या. अशा अवघड परिस्थितीत बससेवा मिळाल्याने पायी चालून शिणलेल्या परप्रांतीय मजुरांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले होते.

रस्त्याने पायी चालणाऱ्या २२० परप्रांतीय मजुरांना मध्य प्रदेशपर्यत चांदवड येथून १० एसटी बसेसने रवाना करण्यात आले. यावेळी चांदवडचे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील व  नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

बसेसद्वारे या मजुरांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत रवाना करण्यात आले. सेंधवा, बुऱ्हाणपूर, भुसावळ असे विलगीकरण करून त्याप्रमाणे त्यांना पुढे रवाना करण्यात येणार आहे.

सगळ्यांच्या मदतीने ते जाणार घरी : उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व प्रादेशिक परिवहन विभाग यांनी प्रवाशांच्या याद्या करून वाहतुकीचे नियोजन केले आहे. तसेच मजूर जेथून पायी निघत आहेत त्या त्या ठिकाणी बसेसची सोय करण्यात आली आहे. विविध स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून मजुरांना पाणी बॉटल, जेवण, नास्ता, बिस्कीटपुडे देण्यात आले आहेत. हे सर्व परप्रांतीय सगळ्यांच्या मदतीने त्यांच्या घरी जाणार असल्याचे मत श्री. मुंढावरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाविषयी व्यक्त केले ऋण : गणेश मिसाळ

घरी जाणाच्या ओढीने हे मजूर पायी चालत असल्यामुळे बऱ्यापैकी थकलेले होते. अचानक त्यांना या बसचा आधार मिळाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाविषयी अतिशय आत्मीयतेने ऋण व्यक्त केले. बसमध्ये बसताना त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच चांदवड येथील सामाजिक संस्थांमार्फत त्यांना बिस्कीटचे पुडे, सॅनिटायझर व मास्क देण्यात असल्याची माहिती, चांदवड उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी सांगितले.

सुरक्षित वावरच्या नियमांचे पालन करून एका बाकावर एक प्रवासी असे बसवून एका बसमध्ये फक्त २१ प्रवासी रवाना करण्यात आले. तसेच महिलांना व बालकांना प्रथम प्राधान्य देण्यात आल्याचे श्री. मिसाळ यांनी सांगितले.

शनिवारी पहाटे ६ वाजेपासून निरंतर बस साेडत आहाेत. साधारण: १०० बस साेडण्याचे पुढील नियाेजन आहे. मध्यप्रदेश शासनाने या प्रवाशांना पुढे घेऊन जाण्याची व्यवस्था केली आहे. कालपर्यंत जे मजूर पायी जात हाेते, ते रविवारी धुळे व मालेगाव येथे आढळून आले नाही. ही सुखावणारी बाब आहे.

जयदीप पवार, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी, धुळे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *