Friday, May 3, 2024
Homeनगरपहिली ते आठवीची परीक्षा रद्द

पहिली ते आठवीची परीक्षा रद्द

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.

- Advertisement -

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली. दरम्यान, शिक्षणमंत्र्याच्या घोषणेमुळे नगर जिल्ह्यातील 5 हजार 376 शाळांमधील पहिले ते आठवीचे 6 लाख 21 हजार 679 विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, करोना संकटामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील शाळा जवळपास बंदच आहेत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. तर, 5 ते 8 वी पर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक ठिकाणी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.

आपण ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले होते. विद्यार्थ्यांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीही आपण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, पहिली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक मुल्यमापन संदर्भात महत्वाचा निर्णय घेत आहे.

देशातील मोफत शिक्षण कायद्यांतर्गत (आरटीई) या विद्यार्थ्यांचं वार्षिक मुल्यमापन करणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा ते शक्य नाही. त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच, इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्णय लवकरच जाहीर करू असेही शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या.

दरम्यान, नगर जिल्ह्यात 2019-20 च्या पटसंख्येनूसार सर्व व्यवस्थापनाच्या 5 हजार 376 शाळा असून यात पहिली ते आठवीचे 3 लाख 36 हजार 746 विद्यार्थी आणि 2 लाख 84 हजार 933 विद्यार्थीनी आहेत. तालुकानिहाय अकोले 36 हजार 591, राहाता 46 हजार 468, राहुरी 44 हजार 852, संगमनेर 63 हजार 770, शेवगाव 35 हजार 504, श्रीगोंदा 37 हजार 695, श्रीरामपूर 39 हजार 388, जामेखड 20 हजार 900, कर्जत 29 हजार 371, कोपरगाव 46 हजार 954, नगर 46 हजार 297, नेवासा 52 हजार 188, पारनेर 34 हजार 367, पाथर्डी 34 हजार 444, महापालिका 52 हजार 890 विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या