पंचायत समिती कर्मचार्‍याने प्रवरा नदीत घेतली उडी : मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

0
तीन दिवसांपूर्वी पुलावरून प्रवरानदीच्या पात्रात उडी घेतलेल्या बाळासाहेब मंडलिक या तरुणाचा सापडलेला मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी.
बेलापूर (वार्ताहर) – तीन दिवसांपूर्वी पुलावरून प्रवरा नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणाचे प्रेत अखेर आज चौथ्या दिवशी सापडले असून त्यांचे नाव बाळासाहेब चंद्रकांत मंडलिक (वय-45) असे आहे.  गेल्या सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान प्रवरा नदीच्या पुलावरून एका तरुणाने नदीत उडी घेतल्याचे काहींनी दुरून पाहिले होते.
त्यामुळे हा तरुण कोण असावा? हे निश्चित होत नव्हते, मात्र पुलावर सापडलेल्या चपला आणि पोलिसांकडे असलेल्या मिसिंग रेकॉर्डवरून काहींनी हा तरुण बाळासाहेब मंडलिक असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. जाण्याआधी त्यांनी मोबाईल घरीच ठेवला होता.
या घटनेची माहिती मिळताच बेलापूर आऊटपोस्टचे पोलीस कॉन्स्टेबल अतुल लोटके, अर्जुन पोकळे, राहुल सोळुंके, गणेश भिंगारदे, बाळासाहेब गुंजाळ आदींनी सलग तीन दिवस बुडालेल्या तरुणाचा वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. काल गुरुवारी श्रीरामपूरचे तहसीलदार सुभाष दळवी यांनी सकाळी नगरच्या एका विशेष पथकाला पाचारण केल्यानंतर बाजारतळावरील खंडोबा मंदिरालगत तरुणाचे प्रेत आढळून आले. या पथकाने ते शिताफीने बाहेर काढले. त्यानंतर या तरुणाची ओळख पटली.
मृत बाळासाहेब मंडलिक हे सुरुवातीला काही वर्षे येथील एका पतसंस्थेत कॅशियर पदी नोकरीस होते. नंतर त्यांना वडिलांच्या जागी अनुकंपा योजनेतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी मिळाली होती. सध्या ते श्रीरामपूर पंचायत समितीच्या अंतर्गत आरोग्य विभागात सेवेत होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. ते अत्यंत मनमिळाऊ असल्याने या घटनेबद्दल बेलापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अचानक त्यांना नैराश्य कशामुळे आले? आणि त्यांनी आत्महत्या का केली? यामागचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

*