19 शिक्षकांची अपंगत्वाची प्रमाणपत्रे बोगस

0

जिल्हा रुग्णालयाचा अहवाल : अन्य दहा शिक्षकांकडून आजार बरा झाल्यानंतरही प्रमाणपत्राचा वापर

  • ज्ञानेश दुधाडे 

अहमदनगर- राज्य सरकारच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये संवर्ग 1 मध्ये अपंगत्व आणि अन्य गंभीर आजारांचा लाभ घेतलेल्या शिक्षकांपैकी तक्रार झालेल्या 136 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांपैकी तब्बल 19 प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाने बोगस (अपात्र) ठरविली आहेत. विशेष म्हणजे गंभीर आजारांच्या 13 शिक्षकांनी प्रमाणपत्र सादर केले होते. यात 10 शिक्षकांना उपचारांची गरज नसताना त्यांनी बदलीचा लाभ घेतला असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि.9) रोजी जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार त्यांच्याकडे आलेल्या 136 शिक्षकांच्या अपंगत्व आणि अन्य प्रमाणपत्रांची तपासणी (पडताळणी) करण्यात आली. यात अपंगत्व प्रमाणपत्र, हृदय शस्त्रक्रिया, पॅरलिसीस, मेंदू विकार यांचा समावेश होता. अपंग शिक्षकांची पडताळणी जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागाच्या डॉक्टरांनी केली होती. पडताळणी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांना तिघांच्या पथकाने मान्यता दिलेली आहे.

यानंतर उर्वरित विकार असणारे शिक्षक यांची प्रत्यक्ष तपासणी आणि त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. असे 13 शिक्षक होते. यातील तिन शिक्षकांना उपचाराची आवश्यकता असून उर्वरित 10 शिक्षक यांचा विकार बरे झालेले आहेत. यामुळे त्यांच्याबाबत जिल्हा परिषदेने निर्णय घ्यावा, असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाच ते सहा दिवस पाठ पुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदऐवजी जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांकडून या अपंग प्रमाणपत्र प्रकरणाची माहिती दिली आहे.

राज्य सरकारच्या बदलीच्या नियमात संवर्ग 1 व संवर्ग 2 मध्ये चुकीची माहिती देणार्‍या शिक्षकांची झालेली बदली रद्द करून त्यांची कायम स्वरूपी एक वेतन वाढ रोखण्यासह संबंधीत शिक्षकाला विस्तापित शिक्षकांच्या जागेवर बदली करण्याचे आदेश आहेत. मात्र, या 19 अपंग आणि अन्य 10 उपचार करून बरे झालेल्या शिक्षकांनी बदलीसाठी जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाची फसवणूक केलेली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याप्रकरणी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 2011 मध्ये अशाप्रकारे बदली सुटी घेण्यासाठी जिल्ह्यातील 76 शिक्षकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे बनावट प्रमाणपत्र सादर केली होती. या शिक्षकांविरोधात जिल्हा परिषदेच्या तत्कालीन प्रशासनाने फौजदारी स्वरूपाची कारवाई करत त्यांना सेवेतून काढून टाकले होते. आता या 19 शिक्षकांविरोधात जि.प. काय करावाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सर्वच शासकीय विभागांतील अपंग प्रमाणपत्रांची पडताळी होणे आवश्यक असल्याचे यानिमित्ताने गरजेचे बनले आहे.
  • जिल्हा स्तरावर चुकीच्या प्रमाणपत्राबाबत निर्णय घेण्याचे अधिकारी राज्य पातळीवरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. त्यांच्या पातळीवर ते योग्य निर्णय घेतील. दरम्यान, आमच्या पातळीवर झालेल्या बदल्यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर 24 किंवा 25 तारखेला सुनावण्या घेऊन त्या निकाली काढण्यात येणार आहेत.
    – राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक. 

 

 

LEAVE A REPLY

*