186 नामांकित शाळांची आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची तयारी

आदिवासी विभागाकडे पाठविले प्रस्ताव, छाननीनंतर प्रवेशप्रक्रिया

0

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या नामांकित शाळा प्रवेश योजनेला राज्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, यंदा राज्यभरातून 186 नवीन इंग्रजी शाळांनी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार आता आलेल्या शाळांच्या प्रस्तावांची छाननी करून त्या शाळांमध्ये आदीवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.

नामांकित शाळांमध्ये प्रवेश या योजनेंतर्गत आदिवासी विकास विभागामार्फत विद्यार्थी पाठविण्यात येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत अर्ज करावा लागतो. प्रवेश निश्चित झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे सर्व प्रवेश शुल्क आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येते.

या योजनेंतर्गत 2005-06 या वर्षात 18 हजार विद्यार्थ्यांना तर 2007-08 या वर्षी 19 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेले आहेत. राज्यात दोन वर्षांत एकूण 162 नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 48 विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत शिक्षण घेत आहेत.

दरम्यान यंदा नवीन 186 इंग्रजी शाळांनी अर्ज केले असून त्यांनीही आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात आणखी 20 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश मिळवता येवू शकतो. प्रस्ताव सादर केलेल्या 186 नामांकित शाळांच्या प्रस्तावाची छाननी आदिवासी आयुक्तालयाकडून केली जाणार असून त्यानंतर ज्या शाळांचे प्रस्ताव मान्य होतील. तेथेच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

नामांकित शाळा प्रवेश या योजनेंतर्गत कोणत्याही प्रतिथयश इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो. संबंधित शाळेतील 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येतो. हा खर्च संबंधित शाळेला दिला जातो. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आणखी शाळांनी या योजनेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

त्यामुळे या नामांकित शाळेत प्रवेश घेणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्याही आपोआप वाढणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांबरोबर नामांकित शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत. त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सदरची योजना उपयुक्त ठरत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे.

विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा : नामांकित इंग्रजी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. इंग्रजी शाळाही यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– राजीव जाधव, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

LEAVE A REPLY

*