सात्रळसह 17 गावांची वीज तीन दिवसांपासून खंडीत

0
सात्रळ (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील सात्रळ, वीज उपकेंद्राच्या हद्दीतील 10 गावे 72 तासांपासून अंधारात आहेत. महावितरणाच्या बाभळेश्‍वर उपकेंद्रातून वीजपुरवठा करणार्‍या वाहिनीत बिघाड झाला. त्यामुळे सात्रळच्या उपकेंद्रातील वीजपुरवठा 3 दिवसांपासून रात्री 11 वाजल्यापासून बंद आहे. वीज नसल्याने सात्रळ, सोनगाव, धानोरे, निंभेरे, तांदूळनेर, कानडगाव, माळेवाडी, डुक्रेवाडी, रामपूर-लक्ष्मीवाडी या गावातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
विजेअभावी पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे बिघडले. पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना लांब-लांबवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. सात्रळ, सोनगावच्या उद्योग व्यवसायांना याचा फार मोठा फटका बसला आहे. विजेअभावी बँकेचे आर्थिक व्यवहार अक्षरश थांबले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. विजेअभावी मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे मोबाईल चार्जिंगसाठी दूरच्या गावात जाण्याची वेळ आली आहे.
वीज नसल्याने जनावरांचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला. त्यामुळे येथील पशुधन मालकांना पाणी शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येथील महावितरणाचे कर्मचारी वादळ व पावसामुळे वीज बिघाड झाल्याचे कारण सांगून वेळ मारून नेतात.

येथील ग्रामस्थांनी बाभळेश्‍वर महावितरण अधिकार्‍यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी उत्तरे देण्याचे टाळले आहे. त्यामुळे महावितरण अधिकार्‍यांविषयी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी दिसत आहे.

LEAVE A REPLY

*