Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

17 कोटींचा इन्कम रिटर्नस् घोटाळा उघड; एचएएलसह 10 कंपन्या, 1 हजार 88 कर्मचार्‍यांची फसवणूक

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात सुमारे 17 कोटी रुपयांचा इन्कम रिटर्नस् घोटाळा उघडकीस आला असून, एका कथित सनदी लेखापालाने 10 कंपन्यांतील अकराशे कर्मचारी तसेच शासनास गंडा घातल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील एचएएलसह 10 कंपन्या व निमशासकीय अशा 1 हजार 888 कर्मचार्‍यांचे स्वतंत्र आयकर विवरण पत्र भरून त्यांच्या वेतनात फेरफार करीत एका कथित सनदी लेखापालाने कर्मचार्‍यांसह शासनास 16 कोटी 77 लाख 74 हजार 23 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठगा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अधिक तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

किशोर राजेंद्र पाटील (रा. संभाजी चौक, नाशिक) असे अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागातील अन्वेषण अधिकारी धनराज के. बोराडे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित किशोर पाटील या सनदी लेखापालाने 2016 ते 2019 या 3 आर्थिक वर्षात महिंद्र्रा अँड महिंद्रा, बॉश, सीएट, सीएनपी-आयएसपी, एमएसईबी, ग्राफाईट, गायत्री पेपर, एचएएल यासंह एकूण 10 कंपन्यांमधील व निमशासकीय विभागातील अशा 1 हजार 888 कर्मचार्‍यांना गंडा घातला.

किशोर पाटील याने सेवकांंचे स्वतंत्र आयकर विवरण पत्र दाखल केले. मात्र, हे करीत असताना आयकर कायद्याचे उल्लंघन केले. त्यात गृह संपत्तीपासून नुकसान केले. तसेच 80(सी), 80(डी), 80(डीडी), 80(ई), 80(जीजी) या कलमांतर्गंत बनावट कपात दाखवून ऑनलाइन पद्धतीने बंगलोर येथे दावा दाखल करून कर्मचार्‍यांच्या नावे शासनाकडून 16 कोटी 77 लाख 74 हजार 23 रुपये व्याजासह घेत अपहार केला.

तसेच कर्मचार्‍यांकडून फी म्हणून शासनाकडून मिळालेल्या परताव्याच्या 20 टक्के रक्कमही किशोर पाटीलने घेतली.
फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आयकर विभागाने पाटीलच्या कार्यालयाची झडती घेतली. कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासणी केली असता ज्या कर्मचार्‍यांची आयकर विवरण भरण्यात आले त्या कर्मचार्‍यांच्या वेतनातही पाटील यांनी फेरफार केल्याचे उघडकीस आले.

तसेच काही बनावट दावेही तयार केले. कंपनी व्यवस्थापनाने कर्मचार्‍यांची योग्य आयकर कपात केल्याचे आयकर विभागाच्या पाहणीत आढळून आले. तसेच कंपनीने कर्मचार्‍यांना फॉर्म 16 देखील दिला आहे. यामुळे आयकर विभागाने पाटीलविरोधात कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!