नाशिक जिल्ह्यात करोना बाधितांची हजाराकडे वाटचाल; दोघांचा मृत्यू, नव्या १६ रूग्णांची भर

नाशिक जिल्ह्यात करोना बाधितांची हजाराकडे वाटचाल; दोघांचा मृत्यू, नव्या १६ रूग्णांची भर

नाशिक | प्रतिनिधी

मालेगाव नंतर शहरात करोनाचा उद्रेक सुरू झाला असून हा आकडा सव्वाशेपार गेला आहे. नाशिक शहरासह आज जिल्ह्याच्या विविध भागातील १५ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे नाशिकमध्ये १२६ तर जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या ९९९ वर पोहचली आहे. तर आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात एका पोलीस सेवकाचा सामावेश आहे. तिसरा पोलीस शहिद झाल्याने पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील १६ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. यात नाशिक शहरातील १० जणांचा सामावेश आहे. यात शहरातील दिंडोरी रोड येथील २, वडाळा येथील १, पखालरोड १, नवीन नाशिकचे पंडित नगर येथील १, जत्रा हॉटेल १, कॅनॉलरोड, नाशिकरोड १, तृप्तीनगर, टाकळीरोड १, पंचवटीतील क्रांतीनगर येथील १, हनुमाननगर येथील १ असे रूग्ण आहेत. यामुळे नाशिकशहराचा आकडा १२६ वर पोहचला आहे.तर सिन्नर तालुक्यातील देशवंडीतील ३ रूग्ण आहेत.

नाशिक शहरात सोमवारी (ता.२५) रात्री व आज दुपारी असे कोरोनाबाधित दोघांचा बळी गेला असून यात ग्रामिण दलात कार्यरत पोलीस हवालदाराचा समावेश आहे. तर दुसरा ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरत राहणारा ५४ वर्षीय चालक आहे. तो उत्तरप्रदेश येथे चारचाकीने मजुर सोडवण्यासाठी गेला होता. माघारी येताना त्यास त्रास झाल्याने चांदवड येथील शासकीय रूग्णालय व पुढे तब्यत खराब झाल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला आहे.

यामुळे शहरात मृत्यु झालेल्यांचा आकडा ७ वर गेला आहे. तर जिल्ह्यात एकुण ५५ मृत्यू झाले आहेत.तसेच आज दिवसभरात ७ करोनाग्रस्त रूग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून मुक्त करण्यात आले आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा ७३५ वर पोहचला आहे.
दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत ४४ हजार ४०३ संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत १० हजार ३४७ स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील ८ हजार ८४९ निगेटिव्ह, ९९९ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील १९२ रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप ५१४ अहवाल प्रलबिंत आहेत. तर आज नव्याने ९४ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील ६, जिल्हा रूग्णालय १२, ग्रामिण ७४, मालेगाव २ संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

तिसर्‍या पोलीसाचा मृत्यू

आज नाशिक ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हेशाखेमध्ये कार्यरत पोलिस हवालदार भाऊसाहेब एकनाथ माळी (५१) यांचा आज दुपारी मृत्यू झाला यामुळे जिल्ह्यातील तिसरा पोलीस शहिद झाला आहे. यापूर्वी कालच माळी यांचे सहकारी घुले यांचा मृत्यू झाला. यापुर्वी हिरावाडीतील पोलिस हवालदाराही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माळीे यांना मालेगाव येथे बंदोबस्तावरुन घरी पाठवण्यात आले होते. पुन्हा त्रास होऊ लागल्याने २१ मेला त्यांना शहरातील डॉ. जाकिर हुसेन रूग्णालयात तपासणीसाठी आले असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना उपचारासाठी आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज दुपारी ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मुळ गाव मालेगाव तालुक्यातील मळगाव हे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुली १ मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबातील ४ सदस्य पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नाशिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: ९९९
* मालेगाव : ६९१
* नाशिक : १२६
* उर्वरित जिल्हा : १३४
* जिल्हा बाह्य ः ४३
* एकूण मृत्यू: ५७
* कोरोनमुक्त : ७३५

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com