15 गावे पाणी योजनेच्या जलवाहिनीेचे मुळा नदीपात्रात काम सुरू

0

 

राहुरी स्टेशन (वार्ताहर) – राहुरी येथील मुळानदी पात्रातील बारागाव नांदूरसह 15 गावे पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन पाण्याचा प्रवाह व बेकायदा वाळूच्या उपशामुळे सातत्याने पाईप वाहून जाणे व नादुरूस्त होऊन तुटत होती. त्यामुळे लाभार्थी गावांचा पाणीपुरवठा खंडित होऊन या योजनेअंतर्गत येणार्‍या गावांमध्ये पाण्याची टंचाई होऊन विस्कळीतपणा येत होता.
यावर कायमस्वरुपी उपाययोजना होण्यासाठी योजना समितीचे अध्यक्ष जि.प.सदस्य शिवाजीराव गाडे यांनी विशेष प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या विशेष फंडातून मुळा नदीच्या पात्रातील जुनी पाईपलाईन बदलवून 150 मीटर लांबीच्या नव्या लोखंडी पाईपलाईनसाठी 24 लाखांचा निधी मंजूर करत युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.
बारागाव नांदूरसह 15 गाव पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन राहुरीच्या मुळा नदीपात्रातून राहुरी खुर्दच्या बाजूने काढण्यात आलेली होती.
मात्र, नदीपात्रात पाण्याचा प्रवाह व वाळूतस्करीमुळे सातत्याने या योजनेला बाधा येत होती. साधारण दिडशे मीटर लांबीची पाईपलाईन नदीच्या पात्रात उंचीवर असल्याने वाळू तस्करांच्या उपद्रवामुळे पाईपलाईन खचणे, तुटणे असे प्रकार अनेकदा घडत असत. त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधून नव्याने नदीच्या पात्रात खोली घेऊन पाईपलाईन वाहून जाणार नाही, याकरिता तीन मीटर खोलीचे लोखंडी गल्डर आतमध्ये टाकण्यात येऊन पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. पाण्याचा कितीही प्रवाह आला तरी पाईपलाईनचे नुकसान होणार नाही.
तसेच यावर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येऊन मजबुतीकरणही करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. 20 वर्षांपूर्वीची जुनी लाईन काढण्यात आली आहे. नव्याने टाकण्यात आलेल्या लोखंडी पाईपांना गंज चढू नये, याकरिता आतून व बाहेरून ‘हिपॉक्सीकोटीन’ व ‘टँपकोटीन’ही करण्यात आले आहे. जेणेकरून पुढील 30 वर्षे या योजनेचे आयुष्य वाढणार आहे.
मुळा धरणाचा पाणीसाठा सातत्याने वाढत असल्याने अचानक केव्हाही नदीपात्रात पाणी सोडले तर काम बंद राहू नये याकरिता गाडे हे स्वतः हजर राहून लक्ष ठेवून आहेत. तसेच काम सुरू असताना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम.कदम, उपअभियंता के.ए.गिते, पंचायत समिती गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, शाखा अभियंता परदेशी यांनी भेट देत कामाची पाहणी करत या महत्त्वाकांक्षी योजनेच्या सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी राहुरी न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे, भाऊसाहेब देवरे, साहेबराव म्हसे, डॉ. तनपुरे कारखाना संचालक रवींद्र म्हसे, नंदकुमार डोळस, अशोक जाधव, महेश जंगम, अनिल आढाव, भिंगारदे, जेधे, पालवे, अफजल पठाण, पाणीपुरवठा योजनेचे सचिव बाळासाहेब गागरे, कर्मचारी शौकत इनामदार, सलिम शेख, रफिक इनामदार आदी उपस्थित होते.

2002 साली कार्यान्वित करण्यात आलेल्या बारागाव नांदूरसह राहुरी तालुक्याच्या पूर्वेकडील 15 गावांसाठी महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचा आरंभ झाला होता. पाणीप्रश्‍न हा जिव्हाळ्याचा व या भागातील जनतेच्या कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी महत्त्वाचा आहे. गेल्या पंधरा-सोळा वर्षांच्या कालावधीत या योजनेचे चांगले काम सुरू असून राज्यातील पाणीपुरवठा योजनेतील ही महत्त्वाची व नावाजलेली पाणी पुरवठा योजना आहे. या योजनेतून 85 हजार लोकसंख्येच्या गावांना पाणीपुरवठा होत असून ही योजना तांत्रिक बाबी वगळता अखंड सुरू आहे. नफ्यात असलेल्या या योजनेत थकबाकी शून्य असून पावणेदोन कोटी रुपये शिल्लक आहेत. या योजनेकामी तत्कालीन जि.प.अध्यक्षा मंजुषा गुंड व विद्यमान अध्यक्षा ना. शालिनीताई विखे पाटील यांचे व जि.प.सदस्यांचेही सहकार्य मिळाले आहे. योजनेअंतर्गत येणार्‍या सर्व गावातील नागरिक व सदस्यांचे यात योगदान आहे.

LEAVE A REPLY

*