ऑक्टोबरच्या अवकाळीने १५ कोटींचे नुकसान

0
नाशिक | दि. ६ प्रतिनिधी – ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील १९ हजार १९७ शेतकर्‍यांना फटका बसला आहे. यामुळे ९ हजार ६८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीपोटी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने १५ कोटी ४४ लाख २७ हजार १५४ रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अगोदरच शेतमालाला भाव नाही. त्यात शासनाने घोषणा केलेल्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. त्यात अवकाळीने दणका दिल्याने हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेला.

ऑक्टोबर महिन्यात दोन ते तीनवेळा झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल दोन महिन्यांनंतर प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यात जिरायत क्षेत्रातील भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या पिकांचे १ हजार ४१३ हेक्टर तर बागायती क्षेत्रातील कांदा, ऊस व भाजीपाला या पिकांचे ९१० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

फळपीक क्षेत्रातील द्राक्ष पिकाला मात्र सर्वाधिक फटका बसला. ऐन छाटणीच्या व झाडाने फूल धरण्याच्या काळातच बेमोसमी पाऊस झाल्याने झाडांची फुले गळून पडली. तर हाती आलेला कांदा भुईसपाट झाला. ७ हजार ३३० हेक्टरवरील द्राक्षांचे नुकसान झाले.

कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र शासनाकडून कोणतेही निर्देश नसल्याने पीक पंचनामे करण्यात आले नव्हते. आता शासनाने पंचनाम्याचे आदेश दिल्यानंतर पंचनामे झाले. आता हा अंतिम अहवाल सादर करण्यात आला असून यात ९ हजार ६८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शासनाकडे वार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये याप्रमाणे १५ कोटी ४४ लाख २७ हजार १५४ रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी
दिंडोरी ८९९४, त्र्यंबकेश्‍वर १२०६, निफाड ६३८५, चांदवड १७६२, कळवण ५१, नाशिक २२७ , इगतपुरी २९५ , सिन्नर २२४, सटाणा २७

LEAVE A REPLY

*