14 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0

नाशिक । 
परराज्यातून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणार्‍या दोन गाड्यांवर छापा टाकून सुमारे चौदा लाखांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने रंगेहात पकडला. चांदवड-लासलगाव रस्त्यावर तसेच आंबोली फाटा (ता.त्र्यंबकेश्वर) येथे या कारवाई करण्यात आल्या.

महागड्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहनांसह सुमारे चौदा लाखाचा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाने जिल्हाभर नाकाबंदी करून अवैध मद्यावर करडी नजर ठेवली जात असतानाच, चांदवड-लासलगाव रोडवरून अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती अधिक्षक चरणसिंग राजपूत यांना मिळाली होती.

त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. भरधाव येणाजया इनोव्हा भरारी पथकाने अडविले असता या वाहनातून देशीदारूची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. याप्रकरणी सूर्यभान जगताप यास अटक करण्यात आली असून इनोव्हा व मद्यसाठा असा 11 लाख 49 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई निरीक्षक विलास बामणे, महेंद्र बोरसे, निंबेकर, बागडे, पावरा आदींच्या पथकाने केली.

दुसरी कारवाई आंबोली फाटा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे करण्यात आली. दमण राज्यातून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, अंबोली फाटा येथे नाकाबंदी करीत मारुती व्हॅगेनार कार रोखण्यात आली असता, या कारमध्ये 2 लाख 10 हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी चालक गोविंद भोर (रा. नाशिक) यास अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई राज्य उत्पादन विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी.बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. डी. चोपडेकर, उत्तम आव्हाड, चव्हाणके, रतिलाल पाटील, धनराज पवार, श्याम पानसरे आदींच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

*