आठ तासात 125 मिलीमीटर पावसाची नोंद; अवकाळीने पिकांचे नुकसान

पंचनाम्याबाबत शासनाककडून मार्गदर्शन मागवणार

0

नाशिक । अरबी समुद्रात आलेल्या ओखी वादळाचा तडाखा नाशिक जिल्ह्यालाही बसला. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यात तब्बल 125.5 मि.मी. पावसाची नोंद झाली असून शहरातही सकाळी 8 ते 5 वाजेदरम्यान 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ऐन हिवाळ्यात पडलेल्या पावसामुळे शहरासह संपूर्ण जिल्हाच गारठून गेला आहे. पुढील 24 तासांत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती विभागाकडून करण्यात आले आहे.

मंगळवारी पाहाटे 4 वाजेनंतर नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्याच दरम्यान उत्तरेकडून येणारे थंड वारेही वाहू लागल्याने हवेत गारवा निर्माण झाला. हलक्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे काहीसा काळोखही पडल्याचे चित्र दिवसभर अनुभवयास मिळाले.

वादाळामुळे पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याचा अंदाज उत्तर महाराष्ट्रासाठी वर्तवण्यात आल्याने जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज होती. दोन दिवसांपासूनच त्यांनी नागरिकांसह सर्वच शासकीय कार्यालयांना याबाबत माहिती दिली होती. जिल्ह्यातील 15 पैकी 14 तालुक्यांत पावासाची नोंद झाली. केवळ सिन्नरमध्येच पावसाची नोंद झाली नसल्याने तेथील शेतकर्‍यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिमी : नाशिक -2, इगतपुरी 8, त्र्यंबक -3, दिंडोरी 4.5, पेठ 22.2, निफाड-1, चांदवड-3, देवळा 15.8, येवळा 7, नांदगाव-6, मालेगाव-3, बागलाण-18, कळवण-6, सुरगाणा 26

पंचनाम्याबाबत संभ्रम : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीची कोणतीही मदत अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नाही. त्यातच आता पुन्हा एकदा ओखी वादळामुळे वातावरणावर परिणाम होऊन जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षांसह कांदा, भाजीपाला, मका पिकांचे नुकसान झाले. मात्र शासन निर्देशानुसार तालुक्यात 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास नुकसानीचे पंचनामे केले जावेत.

मात्र जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात 65 मि.मी. पाऊस झाला नसल्याने पंचनाम्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तरीही प्राथमिक नुकसानीचा अहवाल शासनाला देणार आहोत. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार पंचनाम्याचे आदेश देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. वादळामुळे जिल्ह्यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*