Friday, April 26, 2024
Homeनाशिकरनिंगसाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गंगापाडळी शिवारातील घटना

रनिंगसाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गंगापाडळी शिवारातील घटना

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात हिंगणवेढे येथे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कुणाल योगेश पगारे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून सकाळी मित्रांसोबत तो रनिंग करण्यासाठी घराबाहेर पडला होता अशी माहिती प्राप्त झाली आहे.

अधिक माहिती अशी की, हिंगणवेढे येथील काही मुलं शिंदे बायपास रस्त्यावरून गंगापाडळी पर्यंत दररोज रनिंग करण्यासाठी येतात. आजही ही मुलं पहाटेला घराबाहेर पडून रनिंगसाठी या रस्त्यावर आले. चौघे जन मागेपुढे राहून धावत होते.

- Advertisement -

यातील कुणाल हा मुलगा अधिकच मागे राहिला होता. नेहमीप्रमाणे तोही सोबतीला येईल अशी आशा बाळगून इतर मुलं त्याच्या पुढे धावू लागली होती.

अशातच पाटीलबुवा नामदेव वलवे यांच्या गट क्रमांक 77 मध्ये असलेल्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुणालवर झडप घातली. कुणालचा किंकाळण्याचा आवाज येताच तिघेही मित्र प्रचंड घाबरले. भेदरलेल्या अवस्थेत कसेबसे गंगापाडळी गाव गाठून या मुलांनी ग्रामस्थांच्या कानी सगळी घटना कथन केली.

ग्रामस्थांनी वन विभाग आणि पोलीस पाटलांना घटनेची माहिती दिली. यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मुलाला दवाखान्यात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

परिसरात बिबट्याचा नियमित संचार

रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाचे क्षेत्र असल्यामुळे याठिकाणी बिबट्याचा संचार नियमित असतो. आम्हीही शेताला पाणी देत असताना काळजीपूर्वक स्वसंरक्षण करतो. अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे.
रावसाहेब वलवे, शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या