बारावी पास पंतप्रधान नको तर सुशिक्षित व्यक्तीला संधी द्या – केजरीवाल

0
नवी दिल्ली : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत जनतेने १२ वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवले. आता २०१९ मधील निवडणुकीत जनतेने ही चूक सुधारावी. आता एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधानपदी संधी द्यावी, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘गेल्यावेळी तुम्ही बारावी पास व्यक्तीला पंतप्रधान म्‍हणून निवडले. आता या चुकीची पुनरावृत्ती करु नका. यावेळी एखाद्या सुशिक्षित व्यक्तीस पंतप्रधानपदी संधी द्या. पंतप्रधानपद अत्यंत महत्त्वाचे पद आहे. बारावी पास व्यक्तीला हस्ताक्षर कुठे करायचे हेच समजत नाही.

दिल्लीत पार पडलेल्या या सभेत ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्राबाबू नायडू आदी नेते उपस्थित होते. केजरीवाल पुढे म्हणाले, १४ एप्रिल २०११ रोजी जंतर मंतरवरील ऐतिहासिक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर देशातील जनतेने तत्कालीन यूपीए सरकारला सत्तेतून हटवले होते. त्याच पद्धदतीने आता या सभेनंतर जनता मोदी सरकारला उखाडून फेकणार, असे त्यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या काळातील राफेल करारात विमानांसाठी जास्त पैसे द्यावे लागले. यासाठी मोदीच जबाबदार आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणे कितपत योग्य आहे, असा सवालही केजरीवाल यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय राफेल करारातील सत्य बाहेर आल्यास मोदींना राजीनामा द्यावा लागेल. असे मतही त्‍यांनी व्यक्‍त केले.

केजरीवालांनी भाषणात ममता बॅनर्जींचेही कौतुक केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने सीबीआयच्या कारवाईवरुन टक्कर दिली ते कौतुकास्पदच आहे. पश्चिम बंगालमध्ये जनतेने निवडून दिलेले सरकार आहे आणि केंद्र सरकारने या सरकारवरच हल्ला केला होता. जर पोलीस आयुक्तांना अटक झाली असती तर सर्व राज्यांमध्ये केंद्र सरकारपासून घाबरुन रहा, असा चुकीचा संदेश गेला असता, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*