Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरीत आतापर्यंत १२ टक्के भाताची आवणी

Share

इगतपुरी । प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासुन सर्वत्र दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच भागात भात लावणीच्या कामांनी वेग धरला आहे.

तालुक्यात 131 महसुली गावे आणि 150 हून अधिक पाडे आहेत. यावर्षी 22,869 हेक्टरवर भाताची लागवड अपेक्षित असून यापैकी 3041 हेक्टर अर्थात 12 टक्के क्षेत्रात भात लागवड पूर्ण झाली आहे.

येत्या काही दिवसात संपूर्ण क्षेत्रात लागवड पूर्ण होईल. यासह नागली वरई पिकाची 5 टक्के लागवड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर, मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी शेतकऱ्यांना भात लागवड तंत्रज्ञानाबाबत  मार्गदर्शन सुरू केले आहे.

चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञान आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादनात वृद्धी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

इगतपुरी तालुक्यातील परदेशवाडी येथे भात पुर्नलागवडीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत चार सूत्री पध्दतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर, मंडळ कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी सांगितले की इगतपुरी तालुक्यात ओम 125, इंद्रायणी, सह्याद्री, सोनम, हाळी, आर24, 1008, राधा फुले आणि मसुरी आदी जातीचे वाण शेतकरी वापतात.

महिनाभर हुलकावणी दिलेला पाऊस समाधानकारक सुरू असल्याने भात लागवडीच्या कामांनी वेग घेतला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेतकऱ्यांसाठी तत्परतेने मार्गदर्शन करीत असून शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लाभार्थी शेतकरी त्र्यंबक वाजे म्हणाले की कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार भात उत्पादनात वाढ, जमिनीचा पोत सुधारणे, भांडवली खर्चात बचत, पाण्याचा अपव्यय टाळणे आदी फायदे होऊन किफायतशीर शेती करता येणे शक्य आहे. यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांसह कृषी सहायक काळे आदी उपस्थित होते.

मजुरांची भासतेय चणचण 

एकाच वेळी सर्वच भागात लावणीच्या कामांना सुरुवात झाल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे  इतर ठिकाणांहून मजूर आणावे लागतात. त्यात मजुरांचे दरही वाढू लागले आहेत. एका शेतमजुराला दररोज 300 ते 350 रूपये आणि जेवणाचा खर्च द्यावा लागत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!