खाद्यतेलासह 12 लाखांची लूट

0

पुनतगाव फाटा येथील घटना

नेवासा (प्रतिनिधी) – श्रीरामपूरहून बीडकडे सोयाबीन तेलाचे डबे व बॉक्स घेऊन जाणार्‍या टेम्पोला कार आडवी घालून लुटल्याची घटना नेवासा तालुक्यातील पुनतगाव फाटा येथे घडली. या लुटतीत एकूण 11 लाख 69 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पो चालक नवनाथ ओंकार पवार (वय-29, रा. पुनतगाव, ता. नेवासा) याने नेवासा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी श्रीरामपूर, येथून टाटा 909 मॉडेलच्या टेम्पो क्र. एम.एच.17 – ए.जी. 3780 मधून 6 लाख 65 हजार रुपये किंमतीचे सोयाबीन तेलाचे 400 डबे व 450 बॉक्स भरुन बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पोहोच करण्यासाठी निघालो होते.

दत्तनगर येथील पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर श्रीरामपूर बसस्थानक परिसरात चहा पिवून टेम्पो घेऊन नेवाशाच्या दिशेने निघालो. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास बेलपिंपळगांव फाटा पार करुन पुनतगाव फाट्याजवळ त्यांचा टेम्पो आला असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्वीफ्ट कार चालकाने अचानक टेम्पोला वाहन आडवे लावून टेम्पो थांबण्यास भाग पाडले.

स्वीफ्ट कारमधील दोघांनी खाली उतरत पवार यांना टेम्पोतून खाली ओढून त्यांच्या कारमध्ये बसवले. या दोघांसह कारमध्ये बसलेल्या आणखी दोघांनी दमबाजी करून कारमध्ये बसवून नेवाशाच्या दिशेने काढली. काही वेळात नेवाशात गाडी आली. नेवाशाजवळील विखोना पेट्रोल पंप दिसला त्यानंतर काही वेळाने देवगड फाट्यावरील कमान दिसली.

मी बाहेर पाहत असल्याची चाहूल लुटारुंना लागल्याने त्यांनी मला बाहेरचे काही दिसणार नाही, असे प्रयत्न केले. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील वारीच्या बिरोबा चौकाजवळील काटवनात पवार यांना वाहनातून ढकलून दिले. मात्र जाताना त्यांनी पवार यांच्याजवळील 3 हजार रुपये व मोबाईल हँडसेट चोरुन नेला.

लुटारु गेल्यानंतर पवार यांनी त्यांच्या जवळील दुसर्‍या मोबाईलवरुन फोन करुन मालकासह नातेवाईकांना घटनेची कल्पना दिली. त्यावरुन सकाळी मालकांनी पोलिसांसमवेत पवार यांना घेऊन येत पुनतगांव फाट्यावर शोध घेतला असता तेलाचे डबे व बॉक्स भरलेला टेम्पो गायब असल्याचे दिसून आले.

या लुटारुंनी साथीदारांनीच टेम्पो लांबविल्याची खात्री झाल्याने त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पवार यांच्या तक्रारीवरुन नेवासा पोलीसांनी 6 लाख 65 हजारांचे खाद्य तेल, 5 लाख रुपये किंमतीचा टाटा 909 टेम्पो, 3 हजार रुपये रोख तसेच 1 हजार रुपयांचा मोबाईल हँडसेट असा 11 लाख 69 हजार रुपयांच्या मुद्देमालाची रस्तालूट केल्याप्रकरणी अज्ञात चार जणांविरुद्ध भादवि कलम 394, 341 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वीच नगर-औरंगाबाद महामार्गावरील वडाळा बहिरोबा गावाजवळून याच पद्धतीने तब्बल सव्वा कोटींच्या सिगारेटची लूट करण्यात आली होती. याचा अद्याप तपास लागलेला नसतानाच नेवासा तालुक्यातच सुमारे बारा लाखांची खाद्यतेलाच्या टेम्पोची रस्तालूट झाल्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाहन चालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

*