अकरावी प्रवेशासाठी दहा मार्गदर्शन केंद्रे

मुलींसाठी ‘एसएमआरके’त विशेष केंद्र

0
नाशिक | दि. २३ प्रतिनिधी- नाशिक शहरात अकरावीसाठी यंदा प्रथमच ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या प्रवेशप्रक्रियेविषयी माहिती मिळणे सुलभ जावे यासाठी २६ मेपासून शहरात दहा मार्गदर्शन केंद्रे उभारली जाणार आहेत. याशिवाय केवळ मुलींसाठी एसएमआरके महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार आहे.

शहरात अकरावीसाठी यंदा जागा वाढल्या आहेत. एकूण २४ हजार ५५५ जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. वाढीव जागांमध्ये कला शाखेच्या २८० जागा वाढल्या असून वाणिज्य व विज्ञान शाखेच्या अनुक्रमे ४८० व ६०० जागा वाढल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली. दरम्यान, मागील वर्षी ५२ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश होत होते.

यंदा ५ महाविद्यालये वाढून एकूण ५७ महाविद्यालयांत प्रवेश होणार आहेत. बारावी व्होकेशनलसाठी मात्र जागांची संख्या १४३५ इतकीच राहणार असून यंदापासून हा कोर्स बदलल्यामुळे १३५ जागा वाढल्या आहेत. या सर्वच जागांसाठी ऑनलाईन प्रवेश राबवले जाणार आहेत. त्यासाठी निकालाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रकाबरोबरच ऑनलाईन अर्जासाठीची माहितीपुस्तिका दिली जाणार आहे.

ऑनलाईन अर्ज पुस्तिका छपाईचे काम जवळपास पूर्ण झाले असून दोन दिवसात या माहितीपुस्तिका हातात आल्यानंतर लगेचच मार्गदर्शन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. माहितीपुस्तिकेचा कोणत्याही प्रकारचा काळा बाजार होऊ नये यासाठी महाविद्यालयात हे माहितीपुस्तक वाटले जाणार आहे. अनुदानित तुकड्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यासाठी वेगळे नियोजन करण्यात आले आहे. या सर्वच जागा शहर, महापालिका, देवळाली परिमंडळासाठी असणार आहेत.

LEAVE A REPLY

*