अकरावी प्रवेश : तिसर्‍या यादीअखेर 10 हजार प्रवेश निश्चित

9 ऑगस्टपासून महाविद्यालये होणार सुरू

0
नाशिक । अकरावी प्रवेशासाठी शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीनंतर 10 हजार 920 प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, या यादीत 15 हजार 160 विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली होती.

तिसरी यादी जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार 10 हजार 920 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला तर अद्यापही 4 हजार 196 विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलेले नाही.

दरम्यान, उद्या सोमवारपासून 17 नंबरच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज भरावयाचे आहेत. यासाठी शहरातील विशिष्ट महाविद्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तिसर्‍या गुणवत्ता यादीत जाहीर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी 1 ऑगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, अकरावी प्रवेशाबाबत रिक्त जागांचा तपशील 2 ऑगस्ट रोजी संबंधित संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही आपल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी 3 व 4 ऑगस्टला पसंतीक्रम शाखा बदलण्याची सोय करण्यात आली आहे.

त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. दरम्यान, दुसर्‍या प्रवेश यादीत नाशिक शहरातील सर्वच महाविद्यालयांत 350 ते 400 गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. याशिवाय अनुसूचित जाती-जमाती, विजभज आदी सर्वच जातींना सवलतीनुसार कट ऑफ जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*