नाशिक जिल्ह्यात 115 टक्के पाऊस

0
नाशिक | जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या हंगामात तब्बल 115 टक्के पाऊस झाला. गेल्यावर्षी 102 टक्के पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. लवकरच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणी आरक्षण बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पावसाने नाशिककरांवर विशेष कृपावर्षाव केला आहे. गतवर्षी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 15 हजार 557 मिलीमीटर पाऊस पडला.

म्हणजेच प्रत्येक तालुक्यात सरासरी 1 हजार 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस 102.3 टक्के एवढा नोंदवला गेला. यंदा तर पावसाने जूनपासूनच जोरदार बॅटिंग सुरू केली. जून महिन्यात सरासरी 2324.50 मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा सर्वाधिक 3538 मिलीमीटर पाऊस पडला.

जून महिन्यात तब्बल 152.22 टक्के पावसाची नोंद झाली. अशीच परिस्थिती जुलैमध्येही कायम होती. जुलैमध्ये जिल्ह्यात सरासरी 5671 मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा 8337 मिलीमीटर म्हणजेच 147 टक्के पाऊस पडला. जून आणि जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झाला.

ऑगस्टमध्ये सरासरी 4228.20 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असले तरी 84.38 टक्के म्हणजेच 3567.8 मिलीमीटर पाऊस पडला. सप्टेंबरमध्ये तर पावसाचा आलेख अधिकच खालावल्याचे स्पष्ट होत आहे. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी 2977.20 मिलीमीटर पाऊस पडतो.

परंतु यंदा 66.82 टक्के म्हणजेच 1989 मिलीमीटर एवढाच पाऊस पडला. निफाड तालुक्यात अवघा 24 टक्के पाऊस पडला असून कळवणमध्ये 33.5 टक्के पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे नांदगाव तालुक्यात 158.2 टक्के तर सिन्नर तालुक्यात 122 टक्के पाऊस पडला आहे.

बागलाण आणि देवळा तालुक्यात सरासरीच्या जवळपास 94 टक्के पाऊस पडला. मात्र उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये 40 ते 90 टक्क्यांदरम्यान पाऊस पडला आहे.

LEAVE A REPLY

*