Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

१०८ रुग्णवाहिका रस्त्यात रुतली; गर्भवती खासगी वाहनाने दवाखान्यात पोहोचली

Share

सुरगाणा | प्रतिनिधी 

तालुक्यात दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने तालुक्यातील रस्त्यावर ठिकठिकाणी गुडघाभर खड्डे पडले आहेत. रस्त्याची अक्षरशःचाळण झाली असून याचा परिणाम सर्वसामान्य जनतेसोबतच रुग्णसेवेवरदेखील झाला आहे.

तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रानविहिर येथील सिता शंकर पवार या गर्भवती महिलेला दुपारी अकरा वाजेच्या सुमारास प्रसुती वेदना सुरू झाल्या. त्यांनी दांडीचीबारी येथील उंच डोंगरावर जाऊन गुजरात राज्याच्या मोबाईल टॉवरची रेंज शोधुन कसेतरी सुरगाणा येथील रुग्णालयात 108 रुग्ण वाहिकेला संपर्क केला.

हे अंतर तालुक्यापासून पंचवीस ते सत्तावीस कि.मी आहे. रुग्णवाहिका तात्काळ रानविहिर येथे गर्भवती महिलेस आणण्यासाठी निघाली मात्र, अंबाठा ते डोल्हारा दरम्यान रस्त्यावर अतिवृष्टीने रस्ताच गुडघाभर चिखलात गेल्याने रुग्णवाहिका चिखलात रुतून बसली. तिकडे गर्भवती महिलेचे नातेवाईक रुग्णवाहिकेची चातकासारखी वाट बघत होते.

सर्वांच्या नजरा रस्त्याकडे खिळल्या होत्या. रुग्णवाहिका चिखलातून काढण्याकरीता चालक दिंगबर गावित याने आटोकाट प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी तीन चार कि.मी अंतरावरुन ट्रॅक्टर आणले मात्र तेच गाळात फसले.

शेवटी दुसरा ट्रॅक्टर आणून दोन्ही वाहने काढावी लागली.गर्भवती महिलेस खाजगी वाहन शोधून रुग्णालयात पोहचवले अन् नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. अंबाठा ते खुंटविहीर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!