नाशिक जिल्ह्यात ‘समृद्धी’साठी 102 हेक्टर क्षेत्र संपादित

0
नाशिक । नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत केवळ 7 टक्केच खासगी जमिनीचे संपादन झाले असले तरी डिसेंबरअखेर 90 टक्के भूसंपादन होईल आणि जानेवारी 2018 पासून प्रकल्पाची उभारणी सुरू होईल, असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे.

नाशिकमध्ये 102 हेक्टर क्षेत्र संपादित झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा असून नागपूरहून मुंबईत केवळ सात तासात पोहोचता येणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी देश-विदेशातील 33 कंपन्यांनी रस दाखवला आहे. हे काम 30 महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे, राज्यमंत्री मदन येरावार व एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व संचालक भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकार्‍यांनी ‘समृद्धी’ महामार्गाबाबत सादरीकरण केले. समृद्धीसाठी खासगी व सरकारी मिळून 9,364 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील सरकारी जमीन 833 हेक्टर आहे.

8531 हेक्टर जमीन खासगी आहे. त्यापैकी 600 हेक्टर जमीन आतापर्यंत थेट घेण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातून जाणार्‍या 100 किलोमीटरच्या या महामार्गासाठी 1200 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.

आतापर्यंत 2,750 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी देण्यास 5,644 शेतकर्‍यांंनी सहमती दर्शवली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील 500 शेतकर्‍यांचा समावेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

*