इंद्रधनुषमध्ये शंभर टक्के लसीकरणाचा प्रयत्न

0

विश्‍वजीत माने : जिल्हा रुग्णालयात मोहिमेचा शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी) – गरोदर माता व बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे.
मात्र नगर जिल्ह्यात अर्धवट लसीकरण अथवा लसीकरण न झालेल्या बालकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आल्याने विशेष इंद्रधनुष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात 100 टक्के लसीकरणाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनी केले.
देशभरातील या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या अथवा अर्धवट लसीकरण झालेल्या गरोदर माता, 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांचा शोध घेऊन त्यांचे संपूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे.
यात जोखमीग्रस्त भाग, दुर्गम, डोंगराळ भाग, झोपडपट्टी, स्थलांतरीत वस्त्या, ऊस तोडणी वस्त्यांवर विशेषत्वाने लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
शासनाच्या विशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेचा शुभारंभ रविवारी जिल्हा रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्याहस्ते झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ज्योती मुंढे, डॉ.बापूसाहेब नागरगोजे, जयदीप देशमुख, डॉ.विनोद काकडे, डॉ.संजीव बेळंबे, राजाबापू पाठक, संदीप काळे, निखील जाधव आदी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सांगळे म्हणाले की, विशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ऑक्टोबर 17 ते जानेवारी 18 या कालावधीत दर महिन्याला विशेष लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पहिली फेरी 8 ते 15 ऑक्टोबर दरम्यान, दुसरी फेरी 7 ते 14 नोव्हेंबर, तिसरी फेरी 7 ते 14 डिसेंबर व चौथी फेरी 7 ते 14 जानेवारी 18 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
यासाठी ग्रामीण भागात भागात 253 फिरते पथक व 87 विशेष लसीकरण सत्र तसेच शहरी भागात 15 फिरते पथक व 16 विशेष लसीकरण सत्रे घेण्यात येतील. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बेळंबे यांनी प्रास्ताविक केले. संदीप काळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*