100 मीटर उंचीचा श्रीरामाचा पुतळा उभारणार : योगी सरकारचा निर्धार

0
लखनौ-योगी आदित्यनाथ सरकार अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा 100 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची योजना आखतंय. ‘नव्य अयोध्या’या योजनेंतर्गत सरकार हा भव्य पुतळा प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करत आहे.
शरयू नदीच्या काठावर रामाचा एक भव्य पुतळा उभारण्यापसाठीचा प्रस्ताव योगी सरकारनं राज्यपाल राम नाईक यांच्याकडे पाठवला आहे. पर्यटन विभागाचे प्रमुख सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी या प्रस्तावाचं प्रेझेंटेशन दिलं आहे. राजभवनच्या प्रसिद्धीपत्रकातून या वृत्ताची खातरजमाही झाली आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रामाच्या या भव्य पुतळ्याची उंची 100 मीटरच्या घरात राहण्याची शक्यता आहे. परंतु राज्यपाल राम नाईक यांनी अद्याप या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. उत्तर प्रदेश राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावामध्ये 18 ऑक्टोबरच्या दिवाळी सोहळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. दीपावलीच्या निमित्तानं 1,71,000 दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळल्याने नवा वाद उफाळून आला होता. पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा यांनी ताजमहाल हा सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.
उत्तर प्रदेश सरकारने नव्या पर्यटनस्थळांमध्ये गोरखधाम मंदिराचा समावेश केला आहे. त्यात मंदिराचे छायाचित्र, त्याचे महत्त्व, इतिहास ही माहिती आहे. या पुस्तिकेचे पहिले पान वाराणसी येथील गंगा आरतीला समर्पित करण्यात आले आहे. पुस्तिकेत पर्यटन विकास योजनांची माहिती आहे. पहिल्या पानाबरोबरच सहावे आणि सातवे पानही गंगा आरतीला समर्पित केले आहे.

ताजमहालसाठी 156 कोटी –
उत्तर प्रदेशच्या निर्णयावर जोरदार टीका सुरू होताच, पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा यांनी ताजमहाल व त्याच्याशी निगडित पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले होते. ताजमहाल आणि आग्राच्या विकासाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे प्राधान्य असेल, असे त्या म्हणाल्या. तसेच ताजमहल वा परिसराच्या विकासासाठी 156 कोटी रुपयांची योजना केली आहे. ते काम तीन महिन्यांत सुरू होईल, असा खुलासाही त्यांनी केला होता.

LEAVE A REPLY

*