संगमनेरात कत्तलीसाठी जाणार्‍या 10 जनावरांची सुटका

0
संगमनेर (तालुका प्रतिनिधी) –शहरातील उनमतनगर भागामध्ये कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या जनावरांची शहर पोलिसांनी सुटका केली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
उनमतनगर येथे सेंट मेरी हायस्कूलच्या समोरील काटवनात कत्तल करण्यासाठी जनावरे आणण्यात आल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, शंकरसिंग रजपूत, पोलीस नाईक शिंदे, पोलीस नाईक डमाळे, सहाणे, बोडखे, खाडे, रामनाथ सानप यांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
मुनीफ बबू शेख (रा. भारतनगर, संगमनेर) व मुशरफ बशीर शेख (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) यांनी पाच बैल व पाच गायी सुमारे एक लाख रुपये किंमतीची ही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून ती काटवनात बांधून ठेवलेली होती. पोलिसांनी छापा टाकून या जनावरांची सुटका केली.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5 (अ), (1), 9 सह प्राण्यांना वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3, 11 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामनाथ सानप करत आहे.

LEAVE A REPLY

*