1 एप्रिलपासुन गोदाप्रदुषण करणार्‍यावर दंडात्मक कारवाई ; कचरा टाकणारे, कपडे – वाहने धुणार्‍यांना 1 हजार रु. दंड

0

नाशिक : दक्षिण गंगा संबोधल्या गेलेल्या गोदावरी नदीतील वाढते प्रदुषणाला आळा घालतांनाच गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी आता महापालिकेकडुन कठोर उचलण्यास प्रारंभ केला आहे. आता येत्या 1 एप्रिल 2017 पासुन शहरात गोदावरी नदी पात्रात कचरा टाकणारे, कपडे व वाहने धुवणारे यांच्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यात पहिला गुन्हा करणार्‍यास 1 हजार आणि त्यानंतर त्याच व्यक्तीने दुसर्‍यांदा हा गुन्हा केल्यास त्यास 5 हजार रुपये दंड केला जाणार असल्याची माहिती आज महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली.

केंद्र शासनाने देशांतील नद्या प्रदुषण मुक्तीसाठी खास अभियान हात घेतले आहे. नाशिक मधील गंगा गोदावरी नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषीत केली जात असल्याने मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या गोदावरी गटारीकरण विरोधी मंच यांच्या जनहित याचिकेतून समोर आले आहे.

यात न्यायालयाने प्रदुषण मुक्तीसाठी निरीच्या माध्यमातून विविध उपाय योजना करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आलेले आहे. यात दोन वर्षापुर्वी रामकुंड परिसरात गोदापात्रात कपडे व वाहने धुणार्‍यांविरुध्द गुन्हे दाखल कारवाई करण्यासाठी स्वंतत्र पोलीस पथक तैनात करण्यात आले होते.

त्यानंतर हे पथक गायब झाले आणि कारवाया देखील थांबल्या. तसेच गोदाप्रदुषण मुक्तीचे काम थांबले. या एकुणच प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्त यांनी नदी प्रदुषणमुक्तीसाठी कठोर पाऊले उचलले आहे. यात नदीपात्रात प्रदुषणमुक्तीसाठी काही निर्बंध घातले असुन नागरिकांना धुणे धुण्यासाठी ठराविक जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच गोदापात्रात प्रदुषण रोकण्यासाठी माजी सैनिकांची मदत घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नुकतेच जाहीर केले होते.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आता 1 एप्रिल 2017 पासुन गोदाप्रदुषण करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. यात गोदापात्रात कचरा टाकणे, कपडे व वाहने धुण्याचे प्रकार नागरिक व महिलांकडुन सर्रास होत आहे. याचबरोबर या भागात फेरीवाले, इतर व्यावसायिक व दुकानदार मोठ्या प्रमाणात असुन त्यांच्याकडुन गोदापात्रात अस्वच्छता केली जाते.

अशा प्र्र्रकारे कचरा करणार्‍यांना पहिल्या गुन्ह्यात 1 हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. संबंधीत व्यक्तीने दुसर्‍यांदा नदीत कचरा टाकण्याचा गुन्हा केल्यास त्यास 5 हजार रुपये दंड केला जाणार आहे. याकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शहरात घराघरातून निर्माण होणार्‍या कचर्‍यांचे ओला व सुका असे वर्गीकरण करण्याची जबाबदारी आता नागरिकांवर टाकण्यात आली असुन घराजवळ येणार्‍या घंटागाडीत ओला व सुका असे वेगवेगळा कचरा टाकावा लागणार आहे.

नागरिक व महिलांनी ओला व सुका कचरा एकत्रित घंटागाडीत टाकल्यास संबंधीत कुटुबाला 500 रुपयांचा दंड केला जाणार आहे. तसेच घंटागाडी चालकांनी ओला व सुका कचरा एकत्रीत घेतल्यास संबंधीत घंटागाडी ठेकेदारास 5 हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. अशाप्रकारे गोदा प्रदुषणमुक्ती आणि शहरातील अस्वच्छतेला शिस्त लावण्यासाठी अशी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*