शिक्षकीपेशाची चालता वाट..

शिक्षक हा सैनिक देखील असायला हवा. त्याला सिमेवर जाऊन लढायचे नाही, मात्र त्याला माणूसकीच्या शत्रूसोबत लढण्यासाठी सतत पेरते राहाण्याची शक्ती उभी करायची आहे. आपल्या मुलांमध्ये आपण जे पेरणार आहोत ते उद्याचे राष्ट्र निर्मितीचे, समाज निर्मितीचे सैनिक असणार आहेत. ते सैनिक उभे करण्याचे काम तर शाळांमध्ये घडणार आहे. शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
शिक्षकीपेशाची चालता वाट..

काल मातृदिन साजरा झाला. त्या निमित्ताने आईच्या अंगी असलेल्या मातृहदय, ममत्व, वात्सल्य या गुणांची चर्चा झाली. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगाने हा दिवस स्विकारला. आपली पंरपरा, संस्कृती ही कृतज्ञता व्यक्त करण्याचीच आहे. त्यामुळे आपण आपल्या देशात सातत्यांने विविध सन उत्सव साजरे करताना कृतज्ञतेचा भाव जपण्याची पंरपरा त्यात सामावलेली आहे. त्यामुळे आईला जगात सर्वाधिक स्थान आहे. मात्र आई वडीलांच्या नंतर या संस्कृतीने अधिक महत्व कोणाला दिले आहे तर शिक्षकाला.पण हा शिक्षक केवळ पदवीने युक्त नाही, व्यवसायाने युक्त नाही, नोकरीने युक्त नाही तर हा वृत्तीने युक्त असणार आहे.

गिजूभाईंनी शिक्षक हा मातृहदयी असावा असे म्हटले आहे. शिक्षकाचे हृदय हे आईसारखे असावे. याचा अर्थ तो आईच्या अंगी असलेल्या गुणांने युक्त असावा. त्याला प्रत्येक मुलाबददल प्रेम असायल हवे. ममत्व, वात्सल्य हवेच. आई ज्या हदयाने मुलांला समजून घेते ते हदय प्रत्येकात असावे. मुलांने कितीही चूका केल्या तरी आई पोटात घेते आणि प्रत्येक वेळी त्याला समजून घेत असते. शिक्षकही तशाच असावा. बालकांने शिकतांना जितक्या म्हणून चूका केल्या असतील तितक्या चूका दुरूस्त करण्याची संधी मिळायला हवी.

शिक्षकीपेशाची चालता वाट..
शिक्षकीपेशाची तुटवू वाट....

प्रत्येक वेळी त्या विद्यार्थ्याला शिक्षकांचे आपण बोट धरले आहे याचा अर्थ हा शिक्षणाचा प्रवास तरूण जाण्याची हमी, विश्वास त्याला मिळायला हवा. आईच्या बोटातील विश्वास आणि सावलीतील प्रेमाचा गारवा जितका असतो तितका गारवा आणि विश्वास शिक्षकांने विद्यार्थ्यांने द्यायला हवा. शिक्षकांला विद्यार्थ्यांवरती प्रेम करण्याचा अधिकार मिळाला आहे. आई बालकांना सतत जाणून घेत असते त्या अर्थांने शिक्षकांने देखील विद्यार्थ्यांना सतत प्रेमाच्या प्रपातात ओलेचिंब करायला हवे. त्या अर्थाने तो शिक्षक मातृहदयी असायला हवा. मातृहदयांने निर्माण होणारे नाते अधिक घटट असते. ते घटट असणारे नाते शाळा आणि शाळेबाहरची असायला हवे.

शिक्षक हा सैनिक देखील असायला हवा. त्याला सिमेवर जाऊन लढायचे नाही, मात्र त्याला माणूसकीच्या शत्रूसोबत लढण्यासाठी सतत पेरते राहाण्याची शक्ती उभी करायची आहे. आपल्या मुलांमध्ये आपण जे पेरणार आहोत ते उद्याचे राष्ट्र निर्मितीचे, समाज निर्मितीचे सैनिक असणार आहेत. ते सैनिक उभे करण्याचे काम तर शाळांमध्ये घडणार आहे. त्या अर्थाने कोठारी आयोगाने देखील म्हटले होते की, “शाळांच्या चार भिंतीच्या आत समग्र भारत घडत असतो”. तो भारत अधिक सुरक्षित निर्माण करायचा असेल तर त्या चार भिंतीच्या आत खूप काही पेरावे लागेल. विचारांच्या पेरणीवरती मस्तके घडवावी लागतील. सद्सद् विवेकाची पेरणी, माणूसकीचा धर्म, राष्ट्रप्रेम,जिव्हाळा, भूतदया, सहानूभूती, संवेदना या गोष्टींची पेरणी करावी लागेल. ही पेरणी म्हणजे उद्याची अधिक जबाबदार नागरिक निर्मिती असेल. त्या अर्थाने माणूस निर्मितीसाठीच्या सैनिकांची निर्मिती असेल.

हे सैनिक माणूसकीच्या शत्रूंवरती हल्ला करतील. भ्रष्टाचारी, लोभी, देशद्रोही, समाजात भेदाभेद करणारे, लुटारू, नीच प्रवृत्ती यांच्यावरती विचारांने हल्ला करीत देश अधिक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतील. हे सैनिक निर्मितीचे काम शाळा आणि शिक्षकांनी करायचे आहे. देशाचे बाहय रक्षण करण्याची जितकी जबाबदारी सिमेवरील सैनिकांवरती असते तितकीच जबाबदारी देशाअंतर्गत अधिक उत्तम दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम शिक्षकांचे असते. त्यांनी जे काही पेरले आहे त्यातून समाज समृध्द आणि उन्नत होणार आहे. वाईटाचे मर्दन करणा-या विचाराची पेरणी करण्यासाठीची हिम्मत शिक्षकांनी दाखविण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षक अधिक सक्षम असायला हवा. त्यांचे मस्तक जर ज्ञानाने आणि विवेकाने ओतप्रोत भरलेले असेल तर जबाबदारीची जाणीव होऊन अधिक निरेपेक्षपणे पेरणीचे काम करेल. त्यामुळे एका अर्थांने समग्र मानवजातीचे कल्याण करण्याचे काम शिक्षकाच्या हाती असते. शिक्षकीपेशा हा किती महत्वाचा आहे हे गिजूभाईंनी अधोरेखित केले आहे.

शिक्षकीपेशाची चालता वाट..
खेळता खेळता शिकूया..

शाळेत फार उच्चशिक्षित, विचारवंत शिक्षक नसले तरी चालतील, पण मुलांना समजून घेणारा शिक्षक हवा. खरेतर शिक्षक हा अधिक सुक्ष्म विचार करणारा हवा. केवळ पदव्यांच्या प्रमाणपत्राने सजलेले शिक्षक फार चांगले असू शकतील यावर त्यांचा विश्वास नव्हता. शिक्षक होण्यासाठीच्या पात्रता म्हणजे पदवीचे प्रमाणपत्र नाही, तर विद्यार्थ्याप्रति किती प्रेम आहे यावर ते ठरत असते. शिक्षक होण्यासाठी हदयात प्रेम असेल तर ती सर्वात महत्वाची पात्रता आहे. मुलांना समजून घेणारा शिक्षक महत्वाचा आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्ष ड़ॉ.शकुंतला काळे यांनी आपल्या पूर्व काळातील शिक्षिका म्हणून काही अनुभव लेखन केले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, वर्गात शिकवत असताना एका मुलीने त्यांचा पदर पकडला आणि त्यांना पडायला झाले. त्यांना त्या घटनेचा खूप राग आला. पण त्यांनी स्वतःला सावरत त्या मुलीला जवळ करीत तीला प्रश्न विचारले, का ग माझ्या साडीचा पदर पकडला? तेव्हा ती मुलगी म्हणाली माझ्या आईची साडी अशीच आहे. तीने शिक्षिकेच्या साडीच्या निमित्ताने बाईंमध्ये आई पाहिली होती. त्या घटनेने त्यांच्या डोळ्यात पाणी तराळले. ही घटनाच त्यांच्या शिक्षकीपेशाचा टर्निंग प़ॉईंट ठरला. त्यानंतर मुलांच्या प्रत्येक कृतीतील भाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या समृध्द करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाने त्यांच्या मनात विद्यार्थ्यांच्या प्रति सतत प्रेम टिकून राहिल. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कृतीकडे उत्सुकतेने पाहाणे घडायला हवे. मुलांच्या मनाचा अधिक गंभीरपणे विचार करणारा असायला हवा. शिक्षकांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांने केलेल्या चूकांना देखील त्यांने स्विकारायला हवे. त्या चुकांमधील भावही शिक्षकाला जाणता यायला हवे.

शिकण्यासाठी फार साधने आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे असे अजिबात नाही. शिक्षणाचा मार्ग हा विद्यार्थ्यांच्या प्रति असलेली तळमळ आणि त्यांच्या प्रति असलेल्या जिव्हाळ्याच्या मार्गातून जातो. कधीकाळी या राज्यात अगदी ज्युनिअऱ पीटीसी, सातवी पास असे शिक्षक होते. त्यांच्याकडे फार पदव्या नव्हत्या. ते फार विचारवंत नव्हते पण तरी देखील त्यांनी अनेक चांगली माणंस या व्यवस्थेला दिली. आजही भूतकाळातील गुरूजी आठवले, की त्यांची तळमळ अधिक अधोरेखित होते. परवा आम्हाला शिकविणारे विश्वनाथ घोसाळे गुरूजींचे निधन झाले. मागासवर्गीय समाजातून आलेला हा माणूस जीवनभर भेदाच्य पलिकडे आणि केवळ विद्यार्थ्यांच्यावरती प्रेम करीत शिक्षक म्हणून मुलांना घडवत होता. त्यांच्यातील निर्मळता, सोज्वळता आणि विद्यार्थ्यांसाठीचे प्रयत्न आजही आठवले, की रस्त्यांने जातांना त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जाता येत नव्हते. प्रत्येक गोष्टीत विद्यार्थी समजून घेणे घडत होते. मनात जातीभेदाचा विचार कधीच दिसला नाही.

शिक्षकीपेशाची चालता वाट..
चित्र वाचूया... शिक्षण करूया...

जीवन शिक्षण प्रकाशनाच्या वतीने आठवणीतील शाळा नावाचे पुस्तके प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात राज्यातील अनेक मान्यवरांनी आपल्या आठवणीतील शाळा आणि शिक्षकांबददल लिहिले आहे. त्यातील रेखाटलेले कोणी शिक्षक उच्चशिक्षित होते असे नाही, पण त्यांनी समाजाला किती चांगली माणंस दिली हे पाहिल्यावर त्या शिक्षकांना कसे जमले हा प्रश्न पडतो. त्यामागे गिजूभाई म्हणतात त्या प्रमाणे केवळ मुलांना समजून घेण्याची वृत्ता होती. मुलांच्या प्रत्येक कृतीत कौतूकाची थाप होती. परीस्थितीची जाणीव होती. जबाबदारीचे भान होत. या पलिकडे फार काही नाही. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांप्रति तळमळ, कळकळ असेल विद्यार्थ्यांचा उध्दार ठरेलेला असतो. त्यातून विद्यार्थी व शिक्षक यांच्या नात्यात एक वीण तयार होते आणि ती नात्याची वीण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करीत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजून घेणे म्हणजे त्यांच्याप्रति ओतप्रोत प्रेम ठासून भरणे आहे. या गोष्टीतून शिक्षणाचा मार्ग आखला जात असतो. त्यामुळे शिक्षक म्हणून अधिक संवेदनशील राहाणे महत्वाचे आहे.

समाज, राष्ट्र, विद्यार्थी या सर्वांच्याप्रति असलेली संवदेनशीलता लक्षात घेऊन शिक्षक अधिक सक्षम व्यवस्थेचा पाया घालत असतो. त्या दृष्टीने शिक्षक हे समाज व राष्ट्र निर्माते असतात. त्यामुळे गिजूभाईंनी व्यक्त केलेल्या पाऊलवाटेने चालणे हे सहज सोपे नाही. कोणत्याही पदवी शिक्षणाच्या अभ्यासक्रमातून पेरणी करण्याचा प्रयत्न केला तरी ते उगवणे महत्वाचे आहे. केवळ पेरणी करून उपयोग होत नसतो , त्याकरीता मशागतीचा विचार असावा लागतो.मशागत न करता केलेली पेरणी वाया जाते. त्यामुळे गिजूभाईची पाऊलवाट या देशाच्या शिक्षणव्यवस्थेला प्रकाशमय वाट दाखवून देईल, मात्र तो पर्य़ंत शाळा,शिक्षक आणि समाजातील सर्व घटकांनी मनाची आणि विचाराची मशागत करण्यासाठी प्रयत्न मात्र करायला हवेत. (मागील शिक्षकीपेशाची तुटवू वाट.... लेखात शिक्षकी पेशासंदर्भात विवेचन केल्यानंतर अनेकांनी दूरध्वनी केले आणि गिजूभाईंच्या अपेक्षांबददल आणखी काही लिहावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या म्हणून हा ब्लॉगचा पुढील भाग )

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

Related Stories

No stories found.