‘​एमटीबी’ सायकल स्पर्धेसाठी नाशिकच्या तिघांची निवड

उत्तराखंडमध्ये नैनिताल ते मसुरी असे ८८६ किमीचे अंतर पार करणार

0

नाशिक : सायकलिंग फेडरेशन इंडियाच्या वतीने आणि उत्तराखंड  पर्यटन विभागातर्फे होणाऱ्या एमटीबी (Mountain Bike Racing ) सायकल स्पर्धेसाठी नाशिकच्या भारत सोनवणे, अरुण भोये, गोपीनाथ मुंडे या तिघांची निवड झाली आहे.

विशेष म्हणजे हे तिघेही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा पुरुष गटात Men Elite – १८ ते ३५ वर्षे या वयोगटात पार पडणार आहे.

सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे अहमदनगर येथे निवड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनतर्फे सहभागी झालेल्या भारत सोनवणे, अरुण भोये, गोपीनाथ मुंडे यांनी पहिले तीन क्रमांक मिळवत एमटीबी स्पर्धेसाठी पात्र ठरले. नाशिकच्या आदिवासी भागातून आलेल्या या खेळाडूंना नाशिक सायकलीस्टच्या नर्चर द टॅलेंट या टॅलेंट सर्च उपक्रमातून मोठी मदत झाली आहे.

एमटीबी सायकल स्पर्धा ७ ते १७ एप्रिल दरम्यान होणार असून स्पर्धेचे नैनिताल ते मसुरी असे ८८६ किमीचे अंतर पार करावे लागणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना १० लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

नाशिकमध्ये मोठय़ा प्रमाणात सायकलपटू तयार होत आहेत. यासाठी नाशिक सायकलिस्ट मोठय़ा प्रमाणात काम करीत आहे. नाशिकमधील आदिवासी भागातील काही सायकलपटू गुणवान असून, त्यांना ‘नर्चर दि टॅलेंट’ या उपक्रमातून अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे.

नाशिक सायकलिस्टच्या नर्चर द टॅलेंट या कार्यक्रमांतर्गत भारत, अरुण व गोपीनाथ विविध स्पर्धांसाठी सराव करत असतात. नाशिक पेलेटॉन सारख्या स्पर्धांमध्येही या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत असून अजून मोठ्या संख्येने सायकलिंग खेळाडू अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय सायकलिंगच्या जगतात मोठे करतील असा विश्वास नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक डिस्ट्रिक्ट सायकलिंग असोसिएशनच्या माध्यमातून सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियामार्फत होणाऱ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सायकलपटूंना मोठी मदत होत आहे असे एनडीएसएचे सचिव नितीन नागरे यांनी सांगितले. या खेळाडूंचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

*