७२८ हेक्टर क्षेत्राला ‘अवकाळी’ची झळ

अंतिम अहवाल येईना; शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा

0
नाशिक | दि. २३ प्रतिनिधी – जिल्ह्यात १३ मे रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार ७२८.१३ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांना अवकाळीचा तडाखा बसला. द्राक्ष पिकांचे सर्वाधिक ६२१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही एप्रिल महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवालही अद्याप सादर न झाल्याने नुकसान भरपाईसाठी पुन्हा एकदा प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. जिल्ह्यातील काही भागात १३ मे रोजी गारपीट आणि वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

त्यामुळे नाशिक, दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, चांदवड या तालुक्यांतील २२ गावे अवकाळीच्या तडाख्याने बाधित झाली. गारपिटीमुळे जिल्ह्यात ७२८.१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे ३५५ शेतकरी बाधित झाले. द्राक्ष, टोमॅटो, कांदा, मका, मिरची, डाळिंब तसेच भाजीपाल्याचे अधिक नुकसान झाले. ६२१.४० हेक्टरवरील द्राक्ष, ३० हेक्टरवरील डाळिंब, १४.१८ हेक्टरवरील भाजीपाला, ९.५० हेक्टरवरील मिरची, वाल, ८.४० हेक्टरवरील टोमॅटो, ९.७० हेक्टरवरील कांदा, ६.४५ हेक्टरवरील काकडी या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले.

सरकारच्या धोरणानुसार ३३ टक्क्यांवरील नुकसानग्रस्त भागातच भरपाई दिली जाते. प्रशासनाला याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झालेला नाही. विविध समस्यांनी ग्रासलेले शेतकरी या नैसर्गिक आपत्तीनंतर सरकारकडे आर्थिक भरपाईसाठी आस लावून बसले आहेत. कृषी विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम अहवाल जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने विभागीय आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे सादर केला जाईल. त्यामुळे भरपाईसाठी शेतकर्‍यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पिकांचे झालेले नुकसान
मिरची – ६० हेक्टर
द्राक्ष – ७३ हेक्टर
मका – ११६.७ हेक्टर
टोमॅटो – ४२२ हेक्टर
भाजीपाला – ८८३ हेक्टर
डाळिंब – १,५८३ हेक्टर
कांदा – १,६३३ हेक्टर

LEAVE A REPLY

*