३१ ट्रक पोलीस बंदोबस्तात रवाना

नाशिकमधून होणारी शेतमाल वाहतूक रोखली

0
नाशिक | दि. २ प्रतिनिधी- शेतकर्‍यांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना पोलीस बंदोबस्त पुरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. दोन दिवसांत सुमारे ३१ वाहने पोलीस संरक्षणात इतर जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्यात आली.

नाशिकहून तीन ट्रक आंबा युरोपमध्ये निर्यातीसाठी पाठवण्यासाठी मुंबईकडे रवाना करण्यात येणार आहे. मात्र शेतकरी ंसंपामुळे हे ट्रक ओझर येथे थांबवण्यात आले आहेत. आज रात्री पोलीस बंदोबस्तात हा माल वाहतूक करण्यात येणार आहे. तसेच गुजरातहून एक ट्रक कैर्‍या नाशकात दाखल झाल्या असून हे ट्रक उमराळे येथे थांबवण्यात आला आहे.

हा माल सिन्नर येथे पाठवायचा असल्याने पहाटे पोलीस संरक्षणात हे ट्रक सिन्नकडे रवाना होणार आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी १३ ट्रक पोलीस संरक्षणात इतर जिल्ह्यांकडे रवाना करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला असून नियंत्रण कक्षातील हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू ठेवण्यात आली आहे.
शहरी भागात भाजीपाला, दूधपुरवठा, बाजार समित्यांमध्ये लिलाव होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातून मुंबई शहर व उपनगरांना दररोज २५० ट्रक भाजीपाला जातो. तसेच जळगाव, नगर आणि नाशिकमधून मुंबईला लाखो लिटर दुधाचा पुरवठा होत असतो.

नाशिक जिल्ह्याला लागूनच गुजरात राज्याची सीमा आहे. सीमावर्ती भागातदेखील नाशिकहून भाजीपाला पुरवठा होतो. शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे हा पुरवठा विस्कळीत झाला आहे. शेतकर्‍यांनी गाव, तालुका पातळीवर नाकाबंदी केली आहे. शहरी भागात भाजीपाला व दूधपुरवठ्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडत आहेत.

एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील १५ तालुके नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले असून तेथे २४ तास कर्मचारी कार्यरत आहे.

भाजीपाला व दुधाची वाहतूक करणारे ट्रक, मालगाड्यांना पोलीस संरक्षण देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यास त्वरित पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितले.

नियंत्रण कक्ष कार्यान्वित
जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. ज्या शेतकर्‍यांना किंवा व्यापार्‍यांना पोलीस बंदोबस्त हवा असेल त्यांनी (०२५३) २३१७१५१, २३१५०८० या क्रमांकांवर संपर्क साधल्यास त्यांना संरक्षण देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सुरू आहेत, मात्र आज एकाही बाजार समितीत आवक होऊ शकली नाही.
– रामदास खेडकर , निवासी उपजिल्हाधिकारी

LEAVE A REPLY

*