‘१ मे’च्या कामगार चळवळीचा रक्तरंजीत इतिहास

0
मालक-कामगार संघर्षाची परंपरा शेकडो वर्षांपासून अखंडित आहे. वेठबिगारी, सालबंदी या पद्धतीने सरंजामशाहीपासूनच कामगारांचे शोषण केले जात होते. कालांतराने कामगारांच्या संघर्षातून कामगार कायदे निर्माण झाले. त्यानंतर मालक-कामगारांच्या संघर्षाला प्रारंभ झाला तो आजतागायत सुरू आहे. अलीकडच्या काळात जागतिकीकरणानंतर कामगार-मालकांमधील संघर्षाची जागा समन्वयाने घेतल्याचे चित्र आहे. कारखाना चालवणे व टिकवणे ही जितकी मालकाची जबाबदारी तितकीच ती कामगारांवरही येऊन ठेपली आहे. त्यामुळे असंख्य वर्षांपासूनची मालक-कामगारांची संघर्षाची भूमिका आज समन्वयात बदलल्याचे चित्र आहे. कामगार चळवळीच्या सुरुवातीच्या काळाचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला कामगार भांडवलदाराकडे गुलाम म्हणून काम करत होता. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करावे लागत होते. कामाचे वेळापत्रक काम संपल्यानंतरच संपत होते. भांडवलदाराच्या अधिकाधिक नफ्यासाठी कामगारांची अनिर्बंध पिळवणूक करण्यास मालकवर्ग घाबरत नव्हते. त्यामुळे कामगारांच्या कामाचे तास १९ ते २० तासांवर येऊन ठेपले होते. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला कामगारांनी याविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. एक-एकट्याने लढा देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चिरडून टाकण्यात आला. हळूहळू कामगारांना या शोषणाला जबाबदार भांडवलदार असल्याचे लक्षात येऊ लागल्याने संघटित होण्यास सुरुवात केली आणि येथूनच संघर्षाला सुरुवात झाली.

कामगारांचा पहिला संप
१८०६ मध्ये फिलाडेल्फियाच्या चामड्याच्या उद्योगातील कामगारांकडून १९ ते २० तास काम करून घेतले जात होते. १० तासांचा कामाचा दिवस व्हावा यासाठी पहिला संप केल्याची नोंद आहे. त्यानंतर १८२७ मध्ये याच मागणीसाठी कामगारांनी दुसर्‍यांदा संप केला. १८३४ मध्ये अमेरिकेत डबल रोटी बनवणार्‍या कामगारांनी कामाच्या तासांबाबत संप पुकारला. दुसरीकडे इंग्लंडमध्ये कामगार संघटनांचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी सरकारने कामगार संघटना बनवणार्‍यांविरुद्ध कायदा केला होता. या कायद्यालाही प्रदीर्घ संघर्ष करून कामगारांनी १८२४ मध्ये कायदा बदलून घेतला.

१८३०-४० मध्ये इंग्लंडमध्ये चार्टिस्ट चळवळ झाली. राजकीय हक्कासाठी कामगारवर्ग संघटित झाला होता. जर्मनीत वीण कामगार संघटित होऊन आंदोलनात उतरले होते. या काळात सर्वत्र कामाचे तास १० तास करावे, अशी मागणी कामगारवर्ग करत होता. शेवटी राष्ट्रपती वानबुरेन यांना सरकारी खात्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी १० तासांचा कामाचा दिवसाचा कायदा करावा लागला. त्यापाठोपाठ खासगी भांडवलदारांनाही हा नियम मान्य करावा लागला.

या माध्यमातून भांडवलदारांच्या पिळवणुकीला मर्यादा घालण्यात कामगारवर्गाला यश आले. १० तासांच्या कामाच्या दिवसाच्या मागणीला यश आल्यानंतर कामगारांनी आपापल्या देशातील सरकारकडे ८ तासांचा कामाचा दिवस असावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी भांडवली अर्थव्यवस्थेत पिळल्या जाणार्‍या अनेक देशातील कामगारांनी आंदोलन सुरू केले. कार्ल मार्क्स व फ्रेड्रिक एंगल्स या दोघांनी आपल्या क्रांतिकारक विचारांद्वारे कामगार आंदोलनात सहभाग घेतला. कार्ल मार्क्सने १८४४ साली राजकीय आर्थिक आराखडा, १८४५ साली हायरबार व संबंधी प्रबंध, १८४७ साली तत्त्वज्ञानाचे दारिद्य्र, पवित्र कुटुंब, जर्मनी तत्त्वज्ञान आदी ग्रंथ लिहिले.

एंगल्सने १८४४ साली राजकीय अर्थशास्त्राची टीका तर १८४५ साली इंग्लंडमधील कामगार वर्गाची स्थिती ही पुस्तके लिहून चळवळीला ताकद दिली. या दोघांनीही १८४७ साली भांडवलशाहीचा विकास व शोषणाबाबत आवाज उठवला. १८४८ साली कम्युनिस्ट जाहीरनाम्यात कार्ल मार्क्सने गुलामगिरी व शोषणाविरुद्ध कामगारवर्गाने संघटितपणे संघर्ष करावा, भांडवलदार वर्गाचे वर्चस्व उलथवून टाकून सत्ता काबीज करावी, असे आवाहन केले होते.

तर एंगल्सने कामगारवर्गाची मुक्तता हे खुद्द कामगार वर्गाचेच कार्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या मार्गदर्शनातून कामगारवर्ग पेटून उठला. कामगार संघटना एकत्रित काम करून कामाचे तास कमी करण्यासाठी संघर्षात उतरण्यासाठी परिश्रम घेऊ लागल्या. परिणामी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीत्झर्लंड आदी देशांमध्ये चळवळीला उधाण आले. १८५० ते १८६० मध्ये कामगारांनी ‘८ तास काम, ८ तास मनोरंजन, ८ तास विश्राम’ अशी घोषणा करत भांडवलशाहीला पुन्हा आव्हान दिले.
राष्ट्रीय कामगार संघटना
२० ऑगस्ट १८६६ साली बल्टिमोर शहरात ६० कामगार संघटनांनी एकत्र येऊन विलियम सिल्वीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कामगार संघटना स्थापन केली. संघटनेच्या पहिल्याच अधिवेशनात विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले. भांडवली, गुलामगिरीतून कामगारांना मुक्त करण्यासाठी कामाचे ८ तास असावे असा कायदा करण्याची आवश्यकता आहे, ही मागणी मिळवण्यासाठी कामगार सर्व शक्ती लावण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला.

पुढे स्वीत्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात कामगारवर्गाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात याच मागणीसाठी जागतिक स्तरावरील लढ्याची तयारी गतिमान झाली. अनेक देशांतील कामगार एकत्र येऊ लागले. पाठोपाठ मोठे संघर्ष उभारले जात होते. ८ तासांचा दिवस या मागणीने कामगारवर्गात प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. आंदोलनातील एक नेते इरा स्टिवार्ट यांच्या नेतृत्वाखाली जोरदार राजकीय चळवळ उभारली गेली.

शेवटी अमेरिकी कॉंग्रेसने १८६६ साली ८ तासांचा कामाचा दिवस ठरवण्याच्या कायद्याला मंजुरी दिली. मात्र कायदा कागदावरच राहिला. अंमलबजावणी होत नव्हती. दुसरीकडे संघटना मोडण्यासाठी, चळवळ दडपण्यासाठी भांडवलशाही निर्दयीपणे हल्ले करत होती. १८७५ मध्ये पन्सिलवानियाचा अंथ्राकाईट विभागातील मालकांनी कामगारांचा संघर्ष मोडून काढण्यासाठी १० खाण कामगारांना फासावर लटकवले.

पोलाद व रेल्वे कामगारांनी संप केला. लढाऊपणे संप लढवला. माघार घ्यावी लागली, मात्र त्यांचा उत्साह वाढला. एकीकडे कामगार जगभरात संघटित होत होते. युनियन बांधत होते. मजुरीवाढ, कामाच्या तासांवर मर्यादा या प्रश्‍नांवर आंदोलने होत होती. तर भांडवलशाही चळवळ दडपण्यासाठी प्रयत्नशील होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता या घोषणांवर स्वार असलेली भांडवलशाही कामगारांना मात्र पायदळी तुडवत होती. १८८० मध्ये आंदोलकांनी जोर धोरला.

७ ऑक्टोबर १८८४ मध्ये अमेरिकेत सर्वात मोठ्या अमेरिकी फेडरेशन ऑफ लेबर या संघटनेने ठराव केला. १ मे १८८६ पासून कायद्याने ८ तासांचा कामाचा दिवस झालाच पाहिजे. असा कायदा न केल्यास १ मे १८८६ पासून कामगारांनी काम बंद करून संप करण्याचा निर्णय घेतला. नाईटस् ऑफ लेबर या संघटनेनेही १ मे १८८६ च्या संपाची तयारी सुरू केली. संपासाठी समित्या स्थापन केल्या गेल्या. प्रचार सुरू झाला. संघर्षाच्या ठिणग्या पडू लागल्या. परिणामी १८८५ या वर्षात १५७२ संप झाले. त्यात ६ लाख कामगारांनी सहभाग घेतला. अनेक शहरांतील कामगार या संपात सहभागी झाले होते.

ऐतिहासिक संपाला प्रारंभ
१ मे १८८६ रोजी शिकागो, न्यूयॉर्क, बाल्टिमोर, वॉशिंग्टन, सेंट लुई, पीटस्‌बर्ग, डेट्रॉईट अशा अनेक शहरांतील कुशल, अकुशल कामगारांनी हातातील कामाची अवजारे बाजूला ठेवली व कामावरून निघून आले. हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरलेले कामगार, सभा, निदर्शने, मेळावे यामुळे वातावरण ढवळून निघाले. जगाच्या इतिहासात अभूतपूर्व संप सुरू झाला.

संपाचे विराट स्वरूप शिकागो शहरात दिसून आले. संपाच्या तयारीसाठी ८ तासांची समिती स्थापन करण्यात आली होती. यात नाईटस् ऑफ लेबर, सेंट्रल लेबर युनियन, सोशालिस्ट लेबर पार्टीच्या संबंधित कामगार संघटनांचा समावेश होता. शिकागो शहरातील वातावरण कामगार चळवळीने व्यापून गेले होते. हजारो कामगार १ मे १८८६ साली रस्त्यावर उतरले होते. भांडवलदार व सरकारने पोलीस व फौजांच्या बळावर संप चिरडण्यास सुरुवात केली.

३ मे रोजी ‘हे मार्केट’ स्क्वेअरमध्ये कामगारांची निदर्शने सुरू झाली. अचानक पोलीस व फौजांच्या हल्ल्याने ६ कामगार ठार झाले. सर्वत्र रक्ताचा सडा पडला. या संहारामुळे कामगार चळवळ दबली नाही तर उलट असंतोष खदखदत राहिला. हल्ल्याच्या निषेधार्थ १४ मे १८८६ साली हे मार्केटमध्ये विराट जनसभा आयोजित करण्यात आली. यावेळी पुन्हा पोलीस व फौजांनी हल्ला चढवला. गर्दीत बॉम्ब फेकण्यात आले. त्यानंतर पोलीस-कामगारांमध्ये जबरदस्त संघर्ष पेटला. या संघर्षात ७ पोलीस व ४ कामगार मारले गेले. पुन्हा त्याच ठिकाणी रक्ताचा सडा पडला.

भांडवलदार, शासन, पोलीस आणि फौजा यांच्या मदतीला न्यायसंस्थाही धावल्या. कामगार नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात शिकागोच्या ऍडाल्फ फिशर, ऑगस्ट स्पाईज, अल्बर्ट पारसन्स, जॉर्ज एंगेल या चार कामगार नेत्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. या सर्व प्रकाराने कामगार चळवळ दडपली जाईल, असा भ्रम भांडवलशाहीचा होता. मात्र कामगारांच्या बलिदानामुळे कामगार चळवळ अधिक मजबूत व व्यापक झाली.

१८८८ मध्ये सेंट लुई शहरात बैठक घेण्यात आली. १४ जुलै १८८९ मध्ये पॅरिसमध्ये जागतिक कामगार नेत्यांचे अधिवेशन घेतले गेले. या अधिवेशनात जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय निदर्शने, संप, आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. या निर्णयानुसार युरोप, अमेरिका, स्वीत्झर्लंड अशा अनेक देशात संप, निदर्शने झाली. जगात एकाच वेळी ८ तासांच्या कामाचा दिवस ठरवणारा कायदा करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली.

जगात पहिल्यांदा युरोप, अमेरिका कामगारवर्ग एक सैन्य म्हणून एका झेंड्याखाली आले आणि ८ तासांच्या कामाच्या दिवसाचा कायदा करावा या उद्देशासाठी लढ्यात उतरले. येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा
जन्म झाला. १८९६ मध्ये लेनीनने जेलमधून पत्रक लिहिले. गुप्तपणे बाहेर आलेल्या पत्राच्या २ हजार प्रती ४० कारखान्यांमध्ये वाटप करण्यात आल्या.

त्यात त्यांनी मे दिनाच्या निदर्शनात जास्तीत जास्त सहभाग घेऊन राजकीय स्वातंत्र, श्रमिकांचा विकास व समाजवादासाठी संघर्षाची सुरुवात करण्याचे आवाहन करण्यात आले. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर मे दिनाला स्थान प्राप्त झाले. १९०७ मध्ये ‘वर्कर्स’ साप्ताहिकाने १ मे या दिवसाला कामगारवर्गाचा व क्रांती करण्यासाठी दृढ निश्‍चय व्यक्त करणारा कामगारांचा दिवस असल्याचे म्हटले.

LEAVE A REPLY

*