‘होमग्राऊंड’ तरीही..!

0
या लोकसभेत सर्वाधिक लक्ष गुजरातकडे लागले आहे. कारण नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या गुजरातची जनता यंदा कोणाला कौल देते याकडे लक्ष लागले आहे. 2014 च्या निवडणुकीत गुजरातमध्ये सर्वच्या सर्व 26 जागा जिंकणार्‍या भाजपला यावेळी मात्र वाटते तेवढी निवडणूक सोपी नाही. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगरमधून मैदानात उडी घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. मात्र काँग्रेसही कोणतीच कसर सोडण्यास तयार नाही. गुजरातमध्ये काँग्रेस निम्म्या जागा मिळवण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानातील आकडेवारीचा आढावा घेतल्यास भाजपला सध्या तरी 8 जागांवर नुकसान दिसून येत आहे. काँग्रेसच्या बाजूने गेल्या विधानसभेप्रमाणे मतदान झाले तर सर्व लोकसभा जागांवर क्लीन स्विप करण्याचे भाजपचे स्वप्न हवेत विरून जाईल.

2017 च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपची कामगिरी ही दोन दशकांतील सर्वात खराब ठरली होती. कारण यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपने एकहाती कामगिरी करण्याचा पराक्रम केला होता. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 99 जागा मिळवून सरकार स्थापन केले, तर काँग्रेसने 77 जागा जिंकून मोठी बाजी मारली होती. गुजरातमधील 8 लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या विधानसभा क्षेत्रात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या बाजूने अधिक मतदान झाले. त्यात विशेषत: अमरेली, आणंद, सुरेंद्रनगर, पाटन, जुनागड, बनासकांठा आणि साबरकांठा लोकसभा क्षेत्रात येणार्‍या विधानसभा जागांवर भाजप 14 हजार ते सुमारे 1.7 लाख मतांनी पिछाडीवर राहिली. नोटबंदी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या आदी मुद्यांवरून काँग्रेस मोदी सरकारला धारेवर धरत आहे, तर दुसरीकडे मोदी सरकार कामगिरीचा पाढा वाचत आहे. गुजरातच्या माणसाला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्याच्या भाजपच्या भावनिक आवाहनाला गुजरातची जनता किती साथ देईल, हे आताच सांगणे कठीण आहे.

गुजरातच्या ज्या लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भाग अधिक आहे तेथे काँग्रेसला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागाच्या आधारावरच सौराष्ट्रात काँग्रेस विजयाचा शोध घेत आहे. दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणूक निकालाचा आधार घेतला तर काँग्रेसला सौराष्ट्रात किमान 4 जागा सुरेंद्रनगर, अमेरली, जुनागड आणि बोटाड जिंकण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर उत्तर गुजरातमध्ये पाटन, बनासकांठा तसेच मध्य गुजरातमधील आणंद येथेही जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. याशिवाय छोटा उदयपूर, दाहोद आणि साबरकांठा येथेही काँग्रेस चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा बाळगून आहे. सौराष्ट्र आणि अन्य कृषीबहुल मतदारसंघातील शेतकरी आत्महत्या, किमान आधारभूत मूल्य, पिकांना कमी हमीभाव यांसारख्या मुद्यांवर कॉँग्रेस भूमिका मांडत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेचा अभाव, केंद्राच्या धोरणामुळे उद्योगाचे झालेले नुकसान आणि बेरोजगारीसारख्या मुद्यावरून काँग्रेस सत्ताधार्‍यांना जाब विचारत आहे.

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पुन्हा संधी देणे, विकास आणि राष्ट्रवाद, पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट कारवाई, उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, किमान आधारभूत शुल्कात दीडहून 2 टक्के करणे, आयुष्मान भारत आणि केंद्राची जनधन योजना आदी मुद्यांसह भाजप मैदानात उतरली आहे. भाजपकडून आमदार आणि नेत्यांची पळवापळवी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आमदारांना मंत्री करण्याचे आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात पद देण्याचे आमिष दाखवले जात आहे. काँग्रेसचे नेते कुंवरजी बावलिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. त्याचबरोबर काही नेत्यांनाही भाजपने सामावून घेतले आहे. या कृतीमुळे भाजपला बळकटी मिळत आहे, तर काँग्रेसची स्थिती दोलायमान होत आहे.

LEAVE A REPLY

*