होतोय ‘अवैध’ वाळू उपसा

0
अटी शर्तींचा भंग करून लिलावाच्या नावाखाली

शासनाचा करोडो रुपयांचा महसूल पाण्यात
अधिकारी ‘अर्थकारण’ सांभाळण्यात व्यस्त

कोपरगाव (प्रतिनिधी)- सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत वाळू उपसा करण्याची परवानगी असताना तालुक्यातील सोनारी, मायगावदेवी व कुंभारी येथील शासकीय लिलावात पोकलेन मशिनद्वारे रात्रंदिवस वाळू उपसा केला जात आहे. लिलावाच्या अटी शर्तीचा भंग करून लिलावाच्या नावाखाली अवैध वाळू उपसा होत आहे. शासनाचा करोडो रुपयांचा कर बुडत असताना महसूलचे अधिकारी मात्र आपआपले अर्थकारण सांभाळण्यात व्यस्त आहे.
कोपरगाव तालुक्यातील सोनारी, कुंभारी व मायगावदेवी या तीन ठिकाणचे शासकीय वाळू लिलाव झाले आहेत. सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंत वाळू उपसा करण्याची परवानगी असताना या तिन्ही ठिकाणी रात्रंदिवस वाळूउपसा सुरू आहे. विशेष म्हणजे वाळू उपसा करण्यासाठी यंत्राचा वापर करू नये ही लिलावाची मुख्य अट असताना याठिकाणी महसूल अधिकार्‍यांसमोरच पोकलेन मशिनद्वारे वाळू उपसा करून डंपरमध्ये भरला जातो.

मायगावदेवी येथे 2 हजार 150 ब्रास वाळूचा लिलाव झालेला असताना आत्तापर्यंत येथे 8 ते 10 फूट खोल उपसा करून हजारो ब्रास अवैध वाळू उपसा झाला आहे. लिलावाच्या तिन्ही ठिकाणी महसूलचे कर्मचारी दिवसभर उपस्थित असतात. त्यांना तस्करांकडून तेथेच चहा, नाष्टा, थंडपेय आदींची व्यवस्था केली जाते.

संध्याकाळी घरी जाताना पाकिटेही दिली जातात. त्यामुळे नदीपात्रातून होणार्‍या अवैध वाळूउपशाकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. लिलावाच्या नावाखाली प्रचंड अवैध वाळू उपसा होत असून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र महसूल अधिकार्‍यांचे अर्थकारण वाढत चालल्यामुळे त्यांनी चुप्पी साधली आहे.

 तालुक्यात लिलाव व चोरटी वाळू वाहतूक असे मिळून 700 ते 800 डंपर सुरू आहेत. अवैध वाळू बिनदिक्त ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी तस्करांनी महसूल, पोलीस आदी अधिकार्‍यांची मनाप्रमाणे ओटीभरण केल्याने या वाहनांचा प्रवास आजपर्यंत तरी निर्धोक राहिला आहे. या ओटी भरणामध्ये महसूलला आठवड्याला 4 लाख तर खाकीला प्रति डंपर 15 हजार रुपये महिना बिदागी दिली जात असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

*