हॉकर्सच्या जप्त केलेल्या गाड्या सोडण्यासाठी अधिकार्‍यांकडून तोडीपाणी -पृथ्वीराज सोनवणे यांचा आरोप

0

जळगाव | प्रतिनिधी :  अतिक्रमण पथकाने जप्त केलेल्या गाड्या सोडू नये, असा ठराव करण्यात आला आहे. परंतु महापालिकेचे अधिकारी तोडीपाणी करुन गाड्या सोडवून देत असल्याचा आरोप पृथ्वीराज सोनवणे यांनी केला.

राष्ट्रीय महामार्गालगतचे समांतर रस्ते विकसित करण्याबाबत निर्णय घेण्याच्या ठरावावर चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान ऍड.शुचिता हाडा यांनी हॉकर्सला पर्यायी जागा द्यावी, पट्टे आखून द्यावे, अशी सूचना केली. हाच धागा पकडत पृथ्वीराज सोनवणे यांनी हॉकर्सच्या गाड्या जप्त केल्यानंतर अधिकारी सोडून येतात.

अधिकार्‍यांकडून तोडीपाणी सुरु असून दररोज ३० ते ३५ हजार रुपयांची कमाई सुरु आहे, असा आरोप करत अधिकारराज सुरु असल्याचा टोला देखील पृथ्वीराज सोनवणे यांनी मारला. दरम्यान पृथ्वीराज सोनवणे यांनी काही छायाचित्र सभागृहात दाखवून आयुक्तांकडे दिले. यावर कैलास सोनवणे यांनी हे केव्हाचे फोटो आहेत? कारवाई करा परंतु सत्यता पडताळून घ्या, अशी सूचना मांडली.

महासभेत बोलतांना रवींद्र पाटील, पृथ्वीराज सोनवण
महासभेत बोलतांना रवींद्र पाटील, पृथ्वीराज सोनवण

तसेच फुले मार्केटमध्ये हॉकर्स दिसले तर मी सोडणार नाही, असा गर्भित इशारा देखील कैलास सोनवणे यांनी दिला. अतिक्रमणबाबत चर्चा सुरु असतांना नगरसेवक रविंद्र पाटील यांनी साडेतीन वर्षापासून काहीच कारवाई होत नाही, अशी आयुक्तांना उद्देशून खंत व्यक्त केली. यावर आयुक्त जीवन सोनवणे यांनी आरोप सिध्द झाल्यानंतर कडक कारवाई करणार, असे सांगितले.

गाडी सोडून देण्यासाठी भाजपाचा आमदाराचा फोन

अतिक्रमणच्या विषयावर चर्चा सुरु असतांना महापौर नितीन लढ्ढा यांनी गाडी सोडविण्यासाठी भाजपाच्या एका आमदाराचा फोन आयुक्तांना आला होता. आयुक्तांनी गाडी सोडली नाही, त्यांनी नाराजी ओढवून घेतली, असे म्हणत रविंद्र पाटील हे केवळ फोटो काढून घेण्यासाठी आणि पब्लिसिटीसाठी बोलत असतात. विषयांतर करतात, असे म्हणताच महापौर आणि रविंद्र पाटील यांच्यात चांगलीच जुंपली.

जैन उद्योग समुहाचा अभिनंदनचा ठराव

काव्यरत्नावली चौकात अतिशय कमी कालावधीत जैन उद्योग समुहाने थीम पार्कची उभारणी करुन जळगावकरांसाठी उद्यान उपलब्ध करुन दिल्याबद्दल जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन, अनिल जैन, अजय जैन यांच्यासह जैन कुटुंबियांचे अभिनंदन करण्याचा ठराव महापौर नितीन लढ्ढा यांनी मांडला.

तसेच जागा हस्तांतरीत करुन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आणि समांतर रस्त्याच्या पाठपुराव्यासाठी जळगाव फर्स्ट एक नागरीक मंचसह  अमर जैन, बंटी जोशी, गजानन मालपुरे, दिलीप तिवारी, राधेशाम चौधरी यांचाही अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

गाळ्यांचा प्रश्‍न मार्गी लावावा

गाळ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. परंतु निर्णय काहीच होत नाही. गाळ्यांचा प्रश्‍न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत बंटी जोशी यांनी सांगितले. मार्केटमध्ये खाली असलेले गाळ्यांचा जाहीर लिलाव का करीत नाही? असा सवाल रमेशदादा जैन यांनी उपस्थित केला.

गाळे भाडे वसुलीसाठी स्थगिती नाही तर मग भाडे वसुल का करीत नाही? असे महापौरांनी सांगितले. यावर आयुक्तांनी ठराव क्र.४० ला स्थगिती असल्याचे स्पष्ट केले. अश्‍विनी देशमुख यांनी मार्केटमध्ये रिक्त असलेले हॉल लिलाव पध्दतीने द्यावे, अशी शिफारस केली.

मनपाबाबत दुजाभाव

शासन स्तरावर महानगरपालिकेच्या संदर्भात अनेक विषय प्रलंबित आहेत. निराशाजनक स्थिती दिसू लागली असल्याचे महापौरांनी सांगितले. यावर रमेशदादा जैन यांनी महापालिकेबाबत दुजाभाव केला जातो.

ही भावना निषेधार्थ आहे. निराशेची भावना असली तरी ती पराकोटीला जावू देवू नका. विकास कामे व्हायलाच पाहिजे, अशी भूमिका रमेशदादा जैन यांनी मांडली.

गोलाणी, सतरामजली लेखा परीक्षण अनुपालनाचा ठराव दुसर्‍यांदा तहकूब

तत्कालीन जळगाव नपाने राबविलेल्या गोलाणी संकुल व सतरा मजली प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्रकरणी लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखा परीक्षणाचा अहवाल महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला.यावर निर्णय घेण्याबाबत रमेशदादा जैन यांनी सूचना मांडली.

परंतु लेखापरीक्षण अहवाल उशिरा मिळाल्याने अभ्यास करण्यासाठी तहकूब करावा, अशी सूचना मविआ गटनेते नरेंद्रअण्णा पाटील यांनी मांडली. दरम्यान हा ठराव दुसर्‍यांदा महासभेत तहकूब करण्यात आला.

ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागोवर भाजीबाजार

ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात भाजीबाजार उपलब्ध करुन देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. दरम्यान बंटी जोशी यांनी गेल्या वर्षभरापासून शहरात अतिक्रमणाची कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली.

तसेच भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरीत केल्यानंतर आयुक्त जबाबदारी स्विकारतील का? असा सवाल देखील बंटी जोशी यांनी उपस्थित केला. यावर आयुक्त जीवन सोनवणे यांनी तात्पुरत्या स्वरुपात असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*