Type to search

अग्रलेख संपादकीय

हे काम फक्त शास्त्रज्ञांचेच!

Share
सोळा राज्यांतील 79 जिल्ह्यांत भूजल प्रदूषित झाले असून आरोग्यासाठी घातक बनले आहे. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. भाभा अणू संशोधन केंद्राने हा निष्कर्ष काढला आहे. पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतरचे एक लाखांपेक्षा जास्त पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केले गेले होते. तपासणीनंतर रासायनिक खतांचा भडीमार आणि भूजलाचा बेसुमार उपसा हे सर्वत्र पाणी दूषित होण्याचे मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष अणू संशोधन केंद्राने जाहीर केला आहे.

79 जिल्ह्यांतील अनेक गावांमधील भूजलपातळी 600 ते 700 फुटांपेक्षा जास्त खोल गेली आहे. यामुळे युरेनियमचा धोका वाढला आहे. युरेनियमचा अंश असलेले पाणी आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. यामुळे विविध प्रकारचे कर्करोग, किडनी व यकृताचे गंभीर आजार जडतात. रुग्ण निराशाग्रस्त बनतो. युरेनियम हा धातू जमिनीवरील पाण्यात विरघळतो. रासायनिक खतांमुळे नायट्रेटचे प्रदूषण होते. त्यामुळे वातावरणातील युरेनियमचा गुणधर्म बदलतो आणि ते पाण्याबरोबर विरघळून भूजलात साठते, असा भूजलतज्ञांचा अभ्यासांती निष्कर्ष आहे.

भूजलातील युरेनियमचा धोका राजस्थान आणि हरियाणात प्रथम स्पष्ट झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारने पाण्यातील युरेनियमच्या शोधासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली. त्या मोहिमेची जबाबदारी भाभा अणू संशोधन केंद्राकडे आहे. सरकारी आकडेवारीविषयी जनतेच्या मनात शंका असतात. तथापि हा अहवाल भाभा अणू संशोधन केंद्राचा आहे. ही संस्था डॉ. होमी भाभा यांनी 1954 मध्ये स्थापन केली आहे. हे भारताचे आद्य अणू संशोधन केंद्र आहे. या संस्थेची विश्वासार्हता जगात वादातीत मानली जाते. त्यामुळेच या अहवालाचे गांभीर्य वाढले आहे.

प्रदूषित पाण्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून या समस्येचा तळ शोधण्याचे काम किती कठीण आहे हे यावरून लक्षात यावे. वारेमाप उपसा आणि रासायनिक खतांचा वापर ही मुख्य कारणे सांगितली असली तरी ही समस्या गुंतागुंतीची आहे. प्रत्येक गावाच्या पर्यावरण आणि वातावरणानुसार भौगोलिक कारणे थोडीफार बदलू शकतील. तथापि या समस्येची उकल तडकाफडकी होणार नाही. श्रेयाची ओढाताण करण्यासाठी इतर कारणे नेते आणि पुढारी शोधू शकतात. मात्र जनतेच्या आरोग्याशी संबंधित मुद्यांचा वापर त्यासाठी केला जाऊ नये.

म्हणून पाण्याचे प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी मुख्यत्वे संशोधक शास्त्रज्ञांवर सोपवली जावी. त्यांना स्वतंत्रपणे ते काम करता आले पाहिजे, अशी व्यवस्था झाली तरच अशा गंभीर समस्यांवर योग्य इलाज शोधले जाऊ शकतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!