हेरगीरी करणार्‍या वाळू तस्करांवर करडीनजर

0

24 तास शस्त्रधारी पोलिस, गस्तीसाठी 25 वाहने

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – वाळू तस्करांचा वाढता सुळसुळाट कमी करण्यासाठी महसूल विभागासह पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. चोरट्या मार्गाने वाहतूक करताना पकडण्याच्या भितीने संबधित अधिकार्‍यांच्या घराजवळ किंवा त्यांच्या खासगी व शासकीय वाहनामागे पाळत ठेवणे, पकडलेल्या वाहनास अटकाव करणे आदी प्रकार घडत असल्याने अनाधिकृत वाळू उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे ठोस कारवाई करण्यासाठी प्रशासनाने उपाय-योजना राबविल्या आहेत.

 

या पार्श्‍वभुमिवर जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा व जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली.दरम्यान अनाधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूकीची कारवाई करण्यासाठी जाताना संबधित पोलिस स्टेशनमधील दोन शस्त्रधारी पोलिस महसूल पथकाबरोबर यापुढे राहणार आहेत. याबाबत सर्व उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना सुचना देण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक यांनी सांगितले.

 

 

24 तासामध्ये कोणत्याही वेळी महसुल अधिकार्‍यांनी पोलिसांची मागणी केल्यास शस्त्रधारी पोलिस उपलब्ध होणार आहेत. वाळू उत्खनन व वाहतूक करणार्‍या व्यक्ति विरुध्द सबळ पुरावे प्राप्त झाल्यास संबधिताविरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिनियम 1981 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय काहींच्या विरोधात हद्दपारीची कार्यवाही तात्काळ करण्यात येत आहे.

 

गस्तीसाठी परिपूर्ण 25 वाहने उपलब्ध
उपविभागीय अधिकारी/तहसिलदार व अन्य अधिकार्‍यांच्या घरासमोर व त्यांच्या वाहनांचा पाठलाग करुन हेरगीरी करणार्‍या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करणे सोपे होण्याच्या दृष्टिने गस्ती (पेट्रोलींग) साठी नगर शहर-10, श्रीरामपूर-5, संगमनेर-5 व शिर्डी-5 असे एकूण 25 मोटारसायकली परिपूर्ण यंत्रणेसह उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

LEAVE A REPLY

*