हेरंब कुलकर्णी यांचा दाभोळकर करू

0

दारूविक्रेत्यांची धमकी : अकोल्यात सर्वपक्षीय निषेधाचे पोलिसांना निवेदन

 

अकोले ( प्रतिनिधी)- दारूबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा दाभोळकर करूफ अशी दारुविक्रेत्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यावर अकोल्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यानी पोलिस निरीक्षक व तहसिलदार यांना निवेदन देवून धमकी देणार्‍या गुंडांचा शोध घेवून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

 

 
सर्वोच्च न्यायालयाने 500 मीटरच्या आतील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय दिल्यावर अकोल्यातील सर्व दारू दुकाने बंद झाली आहेत. ही दुकाने पुन्हा सुरू होऊ नयेत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगरपंचायतीकडे रस्ते वर्ग करण्याचा ठराव नगरपंचायतीने रद्द करावा यासाठी हेरंब कुलकर्णी यांनी नगरपंचायतीला निवेदन दिले अवैध दारूविक्रीविरोधात सतत तक्रारी करीत आहोत. यामुळे अकोल्यातील दारूविक्रेत्यांनी अनेक ठिकाणी थेट खुनाची भाषा वापरली. त्यातील एकाने हेरंब कुलकर्णीचा दाभोळकर करूफ अशी भाषा एका ठिकाणी वापरली तर दारू विक्रेते फोनवर एकमेकांशी बोलताना व अनेकांशी बोलताना संपवून टाकू,खलास करू अशी हिंसक भाषा वापरत आहेत.

 

 

अकोल्यातील विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी आज पोलिस व तहसिलदार यांची भेट घेवून महाराष्ट्रात अनेक सामाजिक कार्यकर्ते,माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या खुनाच्या घटना घडलेल्या असताना आपण या धमक्या गांभीर्याने घ्याव्यात व गुन्हा दाखल करावा व चौकशी करावी. 15 एप्रिलपासून आजपर्यंत दारूविक्री करणार्‍या मालकांचे मोबाइल रेकॉर्डिंग तपासावे.यातून अनेक गंभीर गोष्टी पुढे येतील. दारूविक्रेत्यांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवावे. अशी मागणी केली. हे निवेदन देताना कॉम्रेड अजित नवले,शांताराम गजे,चंद्रभान भोत,डी.के.वैद्य,संतोष मुतडक,नितिन जोशी, दत्ता शेणकर, माश्चिंद्रशेठ धुमाळ,गणेश कानवडे, हेमंत दराडे,बबलू धुमाळ, गौराम बिडवे, सुनिल उगले,सचिन जोशी,जयराम गायकवाड,ललित छल्लारे,संदीप शेणकर,सचिन पवार,गणेश धुमाळ,अनिकेत चौधरी,किसन नवले,घन:श्याम माने व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अकोले तालुका युवक संघटना,अंधश्रद्धा निर्मूलन समिती,शिव साम्राज्य प्रतिष्ठान यांचेही प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते

 

 
हेरंब कुलकर्णी, कॉम्रेड अजित नवल यांची भाषणे झाली. या धमकीला उत्तर म्हणून दारूबंदी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल व रस्ते वर्ग करण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न हाणून पाडला जाईल. शासकीय दारूबंदी समितीच्या बैठका होत नसल्याबद्दल अशासकीय सदस्य सुनिल उगले व सचिन जोशी यांनी नायब तहसिलदार यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. शेवटी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन अकोल्यातील रस्ते वर्ग करण्याविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचे जाहीर केले. तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध संघटना,कार्यकर्ते या धमक्यांचा तीव्र निषेध करीत आहेत.

LEAVE A REPLY

*