हुंडा न घेणार्‍या वरपित्याचा विवाह सोहळ्यातच सन्मान

0

मराठा एकीकरण समितीचा अनोखा उपक्रम

राहुरी (प्रतिनिधी) – डाव्या विचारसरणीचा पगडा व सामाजिक भान ठेवून असलेल्या राहुरी तालुक्यातील लांबे कुटुंबाने हुंडा पद्धतीला विरोध करून मुलीचा विवाह जुळविताना मुलाकडील मंडळींचे प्रबोधन करून हुंडापद्धती, मानपान देवाणघेवाण, बडेजाव व खर्चिक बाबी टाळून साध्या पध्दतीने राहुरीतील गंगाधर बाबा छात्रालयात अनोखा व समाजाला आदर्शवादी वाटावा, असा विवाहसोहळा करून समाजासमोर एक परिपाठ घालून दिला. या कामी मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेऊन हा आदर्श विवाह सोहळा यशस्वी केला. विशेष म्हणजे जे वरपिते हुंडा घेणार नाहीत किंवा देणार नाही, अशा दोन्हीकडील वधुवर पक्षांचा सन्मान करण्याचा उपक्रम मराठा एकीकरण समितीच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

 
राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय छावा संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष व मराठा एकीकरण समितीचे पदाधिकारी देवेंद्र लांबे यांनी सामाजिक चळवळीत कार्यरत राहत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. समाजात काम करताना मुलामुलींचे विवाह सोहळे हे समाजाला कर्जाच्या खाईत घेऊन जात आहेत, हे ध्यानी ठेवत यात एक पाऊल पुढे टाकून स्वतःच्या पुतणीचा विवाह जमविताना हुंडापद्धती मोडीत काढण्यासाठी मुलाकडील मंडळींना समजावून सांगत प्रबोधन करून हुंडा पध्दती समाजाला कशी घातक आहे? हे पटवून दिले व मुलाचे वडील शिवाजीराव आढाव यांनाही हे पटल्याने लांबे व आढाव परिवाराने राहुरी तालुक्यात हुंडा पद्धती नाकारली व राहुरी तालुक्याच्या गुहा गावात असलेल्या गंगाधर बाबा छात्रालयातील अनाथ मुलांच्या आश्रमात अनोखा असा विवाहसोहळा साजरा केला.

 
या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व वधूवरांच्या हस्ते पर्यावरणाचा संदेश देत प्रथमतः वृक्षारोपण करण्यात आले. तसेच हुंडा प्रथा मोडीत काढल्याबद्दल वराचे वडील शिवाजीराव आढाव यांचा सत्कार मराठा एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आला. तसेच यापुढे राहुरी तालुक्यात ज्या लग्न सोहळ्यात हुंडा घेतला जाणार नाही किंवा देणार नाही, अशा विवाह सोहळ्यात जाऊन वधू व वर मातापित्यांना मराठा एकीकरण समितीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल, असे मराठा समितीच्या वतीने घोषित करण्यात आले.

 

लांबे व आढाव परिवाराचा वतीने सत्काराला फाटा देऊन ही रक्कम समाजोपयोगी कामासाठी मराठा एकीकरण समिती व गंगाधर बाबा आश्रमास देण्यात आली. वधू शुभांगी व वर योगेश या जोडीच्या हस्ते वृक्षारोपण, महामानवांच्या प्रतिमा पूजन, तसेच धान्याची नासाडी न करता अक्षतारूपी पुष्पांचे वाटप करून वर्‍हाडींनी फुलांचा वर्षाव करून आशीर्वाद दिले. यावेळी लग्नसोहळ्याच्या मंडपात रूखवत म्हणून विविध समाजाभिमुख आकर्षक व प्रबोधनात्मक घोषवाक्यांचे फलकाने शोभून दिसत होते. यात ‘लेक वाचवा, लेक शिकवा,’ हुंडाबळी, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, प्रदुषणमुक्ती, पर्यावरण, झाडे लावा, पाणी वाचवा, असे फलक उठून दिसत होते.

गंगाधर बाबा आश्रमात हा सोहळा आयोजित करून आश्रमातील मुलांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले. या अनोख्या अशा समाजाला दिशा देणार्‍या विवाह सोहळ्याला आलेल्या वर्‍हाडींनी भरभरून कौतुक करून अनिष्ट रुढी परंपरेला फाटा देणार्‍या आगळ्यावेगळ्या विवाहाचे स्वागत करण्यात आले.

सध्या महागाईचा जमाना आहे, आपण संगणक युगात वावरतो आहोत. त्यामुळे हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यासाठी भावी वधुवरांनीच आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घ्यायला हवी. हुंड्यापायी आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक शेतकर्‍यांना गळफास घ्यावा लागत आहे. ही अत्यंत वेदना देणारी घटना आहे. आजच्या या जमान्यात स्त्री व पुरूषांना समान दर्जा देण्यात आल्याने हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा आता आपोआप बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
– राजेंद्र लबडे पाटील, राहुरी मराठा एकीकरण समिती.

महाराष्ट्रात हुंडा पद्धतीनुसार विवाहाची संकल्पना मोडीत निघायला हवी. अनिष्ट रुढी परंपरा याला फाटा देणे ही सद्यस्थितीत काळाची गरज आहे. हुंडा, मानपान, देवाणघेवाण, यामुळे मुलींच्या माहेरकडील मंडळी खोट्या प्रतिष्ठेपायी कर्जाच्या खाईत लोटले जातात. अनेक मुलींना हुंड्यापाई जीव गमावून बसण्याची वेळ आलेली आहे. सुखी संसाराची स्वप्न रंगवणारी माहेरच्या लाडात वाढलेली लेक हुंड्यापाई मरणाला कधी कवटाळून बसते व सासरच्या जाचापाई सरणावर कधी जाते? हे समजतही नाही. तरीदेखील समाज या अनिष्ट रुढीला फाटा देऊन हुंडा पद्धती बंद करायचे धाडस करत नाही, याची खंत वाटते.
– प्रवीण देशमुख पाटील, मराठा एकीकरण समिती

सोहळ्यात
महापुरुषांना अभिवादन
मराठा एकीकरणचे ‘पाऊल पडते पुढे’
रुखवताऐवजी वृक्षारोपण
सामाजिक संदेश फलक

LEAVE A REPLY

*