Type to search

ब्लॉग

ही वेळ का आली?

Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कसे काम करतात ते लक्षात घेऊन त्यांच्याकडून ते शिकून घ्या, असा सल्ला शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. ही वेळ त्यांच्यावर का आली?

स्थापनेपासून राज्यात सलग 15 वर्ष आणि केंद्रात 10 वर्ष राष्ट्रवादी सत्तेत सहभागी असतानाही शरद पवार यांना कार्यकर्त्यांनी संघ स्वयंसेवकांची चिकाटी शिकावी असा सल्ला देण्याची वेळ का आली?

2004 च्या विधानसभा निवडणुकीत हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता. 2009 ते 2014 या पाच वर्षात घोटाळयांमुळे इतका बदनाम झाला की पक्ष यातून सावरूच शकला नाही. 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीचीही वाताहत झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही.

विधानसभेच्या निवडणुकीला जेमतेम तीन महिने बाकी आहेत. ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई आहे. विधानसभेत पुन्हा विरोधी बाकावर बसण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची मानसिकता नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आज 20 वर्षानंतर अवघड वळणावर येऊन पोहचली आहे. राष्ट्रवादीची स्थापना हे पवारांचे काँगेसमधील दुसरे बंड होते. पवारांनी पहिले बंड केले ते 1978 मध्ये! समाजवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपले नेतृत्व मानणारा गट कार्यरत ठेवला. काँग्रेसच्या बाहेर राहून त्यांनी 1980 आणि 1985 च्या निवडणुका लढवून आपले बलस्थान निश्चित केले. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले. राजीव गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची धुरा पवारांकडे दिली. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत बहुमत काँग्रेसचे पण सत्ता पवारांची असे चित्र होते.

1995 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पाडाव झाल्यानंतर पवारांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची सूत्रे छगन भुजबळ, मधुकरराव पिचड यांच्याकडे सोपवून केंद्रीय राजकारणात पुन्हा उडी घेतली. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत पवार लोकसभेवर निवडून गेले. बाराव्या लोकसभेत (1998) पवार हे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी पवारांनी महाराष्ट्रातून काँग्रेसचे 33 खासदार निवडून आणले होते. 1999 मध्ये वाजपेयींचे सरकार एका मताने पडल्यानंतर सोनिया गांधींच्या गटाने पवारांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवले. या अंतर्गत घडामोडीतूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. राष्ट्रवादीच्या संस्थापकांमध्ये तारीक अन्वर, दिवंगत पी. ए. संगमा यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादीची स्थापना होत असताना पवारांना विधनासभेतील 45, विधान परिषदेतील 15 आणि लोकसभेतील 11 खासदारांनी पाठिंबा दिला. पक्ष स्थापनेनंतर राष्ट्रवादीला लगेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागले. पवारांनी रामदास आठवले, शेकाप, समाजवादी पक्ष, जनता दल अशा छोटया-मोठया पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या. 1999 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 6 खासदार तर 56 आमदार निवडून आले. महाराष्ट्र विधानसभेचे निकाल त्रिशंकू आल्याने पवारांनी काँग्रेससोबत सत्तेचा पाट मांडला. काँग्रेसशी आघाडी करून सरकार स्थापन करणे ही पवारांची राजकीय मजबुरी होती.

सरकारमध्ये पवारांनी आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार अशा तरुण रक्ताला त्यांनी वाव दिला. इतर मागासवर्गाचे प्रतिनिधित्व करणा़र्‍या छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केले. सत्तेत सहभागी होताना राष्ट्रवादीने गृह, वित्त, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, ग्रामविकास अशी महत्त्वाची खाती घेतली. या खात्यांच्या माध्यमातून पक्षाचा राज्यभर विस्तार केला. 2003 मध्ये काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत 71 जागा जिंकून राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

गेल्या 20 वर्षात राष्ट्रवादीला जे यश मिळाले
तर त्यात पक्षापेक्षा स्थानिक वजनदार नेतृत्वाचा मोठा वाटा होता. बेरजेचे राजकारण करणाऱया पवारांना आपल्या ताकदीवर पक्ष वाढविण्यात मर्यादा आल्या. राष्ट्रवादीची रचना राजकीय पक्षासारखी असली तरी प्रत्यक्षात हा पक्ष स्थानिक सुभेदारांचा राहिला. स्थानिक राजकारणावर वर्चस्व असलेले सुरेशदादा जैन, पप्पू कलानी, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते, दत्ता मेघे अशा नेत्यांनी पवारांना सोबत केली. परंतु, राष्ट्रवादीची उपयुक्तता संपल्यानंतर यातील अनेक नेते पक्षाला सोडून गेले. त्याचे अनेकदा प्रत्यंतर आले. पवारांनी ज्यांना संधी दिली ते नंदूरबारचे डॉ. विजयकुमार गावित, सांगलीचे संजयकाका पाटील यासारख्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये
प्रवेश केला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या 228 मतदासंघात शिवसेना-भाजप युतीचा वरचष्मा राहिल्याने पक्षाचे आमदार हादरून गेले आहेत. विजयसिंह मोहिते-पाटील, जयदत्त क्षीरसागर यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीतील अस्वस्थता समोर आली आहे. राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष बनविण्याची पवारांची महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळेच पवारांनी महाराष्ट्राबाहेर पक्ष वाढवायचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही.

गेल्या 20 वर्षात नवी पिढी मतदार म्हणून उदयास आली. या पिढीला पवारांच्या कर्तृत्वाचे आकर्षण राहिलेले नाही. निस्वार्थीपणे काम करणारे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये का तयार झाले नाही? अथवा केले गेले नाही? याचा विचार करण्याची वेळ राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वावर आली आहे.
– राजेंद्र पाटील, 9822753219

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!