Type to search

अग्रलेख संपादकीय

ही कौशल्ये कुठे मिळणार?

Share

विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘जीवनकौशल्य’ हा नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. विद्यार्थ्यांत भावनिक आणि बौद्धिक क्षमता वाढावी, त्यांच्यात मौखिक आणि लिखित संवाद कौशल्यांचा विकास व्हावा हा या अभ्यासक्रमामागील मुख्य हेतू सांगितला जात आहे. गुगल शोधाचा व समाज माध्यमांचा वापर करताना नैतिक मूल्ये आणि शिष्टाचार कसे पाळावेत?

नोकरीसाठी वैयक्तिक माहितीपत्र (रेझ्युमे) कसे करावे? अशा मुद्यांचा तसेच योग व प्राणायामचाही समावेश या अभ्यासक्रमात आहे. त्याला आठ गुण असतील. वर्षभरात पार पडणार्‍या कोणत्याही एका सत्रात ते दिले जातील. लिखित कौशल्यांचा विचार करताना समाज माध्यमांवरील लिखाणाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. समाज माध्यमे हे जनसंपर्काचे उत्तम माध्यम आहे. त्याचे फायदे-तोटे विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे असे आयोगाला वाटते. आयोगाचा निर्णय काळानुरूप आहे यात शंका नाही.

उच्चशिक्षितांतसुद्धा सामान्य कौशल्यांचाही अभावच आढळतो. गुणवत्ता व चौकटबाह्य दृष्टिकोनाचा अभाव, आत्मविश्वासाची उणीव, समाज माध्यमे व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याविषयक अज्ञान ही उच्चशिक्षित विद्यार्थ्यांत आढळणारी सामान्य लक्षणे आहेत. कित्येेक विद्यार्थ्यांना नोकरीसाठी करायचा अर्ज कसा लिहावा हेसुद्धा माहीत नसते. भाषा कौशल्याची तर बोंबच आहे. अर्थात त्याला समाज माध्यमेदेखील अपवाद नाहीत. किंबहुना ते अज्ञान वाढवण्यात त्यांचाही सहभागच आहे.

मोठमोठ्या व्यावसायिक कंपन्या व समाजतज्ञ हे वारंवार निदर्शनासही आणून देत आहेत. औरंगाबाद येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार कार्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या उपक्रमात सव्वीसहून जास्त कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मुलाखतीसाठी दोन हजाराहून जास्त विद्यार्थी आले होते. त्यापैकी फक्त 159 विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकला. अनेकांना मुलाखतीचा पहिला टप्पाही पार करता आला नाही. इतरत्र यापेक्षा किती वेगळी परिस्थिती असू शकेल? रोजगार आहेत,

पण कौशल्यपूर्ण मनुष्यबळ नाही ही मोठीच उणीव सर्वच क्षेत्रात निर्माण झाली आहे. ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न होत आहे असे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जीवन कौशल्य अभ्यासक्रमावरून वाटते. तथापि हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? आयोगाला असे जाणते कुठे सापडतील? की कांद्यासारखी त्यांचीही परदेशातून आयात करावी लागेल? पण जाणते उपलब्ध झाले तरच जीवन कौशल्यसारख्या महत्त्वाकांक्षी योजना फलद्रुप होऊ शकतील.

अन्यथा सध्या सामाजिकतेचा व समाजकार्याचा बुरखा पांघरून प्रत्यक्षात राजकारण किंवा अन्य नसते उद्योग व उपद्व्याप करणार्‍या मंडळींचा, संस्थांचा व संघटनांचा बोलबाला आहे. मोठमोठ्या सरकारी पदांवर त्या-त्या विषयांच्या तज्ञांऐवजी काही विशिष्ट हेतूने कार्य करणारे कार्यकर्ते नेमले जातात, अशी भावना समाजात रुजली आहे. जीवनकौशल्ये अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना हा समज आणखी दृढ होणार नाही याची दक्षता अनुदान आयोग घेईल अशी आशा करावी का?

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!