Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हिल स्टेशन की खड्ड्यांचे स्टेशन? प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

Share

प्रतिनिधी | इगतपुरी

इगतपुरी शहर लवकरच लोणावळा खंडाळाच्या धर्तीवर हिल स्टेशन होणार अशी घोषणा नुकतीच राज्याचे नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असताना इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावर व शहरातील विविध भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शहर वासियांकडून केली जात आहे.

शहरातील मुक्या रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली असताना प्रशासन मात्र एकेमेकांवर बोट दाखवण्यात व्यस्त आहे. पर्यटक तसेच शहरवासी खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत, त्यामुळे अनेकदा वाद ही होत आहेत. अनेक नागरिक जखमी झाले असून, दुचाकीसह वाहनांचे नुकसान होत आहे. खड्ड्यांच्या त्रासामुळे वाहनचालकांना सततच्या प्रवासाने मणक्याचे आजार जाणवत आहेत. त्यामुळे वाहनाच्या डागडुजीचा आणि आरोग्यावर होणारा खर्च ही वाढला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन डागडुजी करावी अशी मागणी नागरिक करत आहे. इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गाचे 5 वर्षांपूर्वी 14 कोटी खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरण महिंद्रा कंपनी ते गिरणारे गाव पर्यंत करण्यात आले. कामाच्या निकृष्ट दर्जामुळे पाचच वर्षात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाली असून ते जीवघेणे ठरत आहेत. दुसरीकडे प्रशासन मात्र पावसाला दोष देत जबाबदारी झटकत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

शहरातील रेल्वे स्थानक नजीक तसेच देना बँक, बुद्धविहार, टिकापुरी, बसस्थानक, हॉटेल शिवमसमोर, शिवसेना कार्यालय, भाजी मार्केटरोड, राममंदिर, तीन लकडी पुलाजवळ अर्धा फूट ते एक फुटापर्यंत खड्डे झाले असून वाहन चालवणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे पर्यटकदेखील नाराजी व्यक्त करत आहे.

येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून अनेक वेळा खड्डे चुकवत असताना अपघात होताना दिसून येतात. तसेच सतत गाडीचे टायर पंक्चर होऊ लागले आहे, त्यामुळे आर्थिक झळही बसत आहे. रस्त्यांवर मातीही असल्याने पादचार्‍यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

-नितीन चांदवडकर, स्थानिक वाहनधारक

इगतपुरी शहरातील काही भागात मोठमोठे पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या त्रासाने नागरिक बेहाल झाले आहेत. अशा रस्त्यावरील सततच्या प्रवासाने नागरिकांना मणक्याचे आजार उद्भवत आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करून ही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन दिलासा द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे.

-प्रथमेश पुरोहित, नागरिक

मागील 20 वर्षांपासून वाहन चालवत आहे. शहरातील प्रमुख रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे गाडीचा खर्चही वाढला आहे. सततच्या होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे दोन मिनिटाच्या प्रवासाला अर्धा तास जातो. मुंबई-आग्रा हायवे जवळ असल्याने अपघाती रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात, पण रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नाही.

-नवाज इनामदार, वाहनधारक

दुरुस्तीसाठी विलंब का?

इगतपुरी शहरातील मुख्य असलेला हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने हा कोटी रुपये खर्चून काँक्रिटीकरण करून बांधला होता. पण या रस्त्याची पाचच वर्षात चाळण झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ता बांधला असून रस्ता मात्र नगरपालिका हद्दीत आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. अशा अवस्थेत नगरपालिका अधिकारी या रस्त्याची जबाबदारी स्वीकारत नाही, तर दुसरीकडे बांधकाम विभाग नगरपालिका हद्दीचे कारण पुढे करीत आहे. नेमकं तक्रार कुठे करायची हा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे.

-सुमीत बोधक, मनसे शहर अध्यक्ष

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!