Type to search

हा दहशतवाद कधी संपणार?

अग्रलेख संपादकीय

हा दहशतवाद कधी संपणार?

Share
जातपंचायत आणि समाजातील अनिष्ट रुढीला विरोध करणार्‍या कार्यकर्त्याला जातपंचायतीच्या अतार्किक फतव्याचा व बहिष्काराचा सामना करावा लागण्याचे दुर्दैव अजून थांबलेले नाही. विवेक तमायचीकर हा कंजारभाट समाजातील एक युवक कार्यकर्ता! वधूची कौमार्य चाचणी घेण्याच्या त्या समाजातील अनिष्ट प्रथेचा विवेक आणि त्याच्या पत्नीने ठाम विरोध केला.

समाजाच्या अतार्किक दबावाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला. ती पद्धत अमान्य करून त्याने स्वत:चे लग्न केले. त्यांना समाजातील अनेक तरुणांची साथ मिळाली. हळूहळू अनेक तरुण कौमार्य चाचणीच्या प्रथेविरुद्ध भूमिका घेत आहेत; पण यामुळेच समाजातील दहशतवादी धर्ममार्तंडाचे पित्त खवळले.

नुकतेच विवेकच्या आजीचे निधन झाले. खरे तर कुठल्याही भारतीय समाजात अशा दु:खद प्रसंगी मयताच्या कुटुंबाच्या मदतीसाठी तातडीने धावून जाण्याची प्रथा आहे; पण कंजारभाट समाजाने विवेकच्या आजीच्या अंत्यविधीला येण्याचे नाकारले. उलट त्याचवेळी समाजातील दुसर्‍या घरी एका मुलीच्या हळदीचा कार्यक्रम योजला.

सर्वांनी जमून तो धूमधडाक्यात साजरा केला. मुद्दाम डीजे वाजवण्यात आला. ‘विवेकची आजी मेली असून डीजे का लावला?’ याचे रसभरीत वर्णन भाषणातून एका तथाकथित नेत्याने सर्वांना ऐकवले. आजीच्या अंत्ययात्रेला वा नंतरच्या विधीला कुणीही जाऊ नये असे जाहीर आवाहन केले. या भाषणाची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर सध्या फिरत आहे. आजीचे सर्व उत्तरकार्य उरकल्यावर या प्रकाराची पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इरादा विवेकने माध्यमांकडे व्यक्त केला आहे. पुढे नेमके काय घडेल हे आजच कसे समजणार?

तथापि एका तरुण सामाजिक कार्यकर्त्याला अनिष्ट प्रथेला विरोध केल्याबद्दल समाजाचे धुरीण म्हणवणार्‍या गणंगांनी अशी वेळ आणावी हे आजच्या काळाशी किती सुसंगत आहे? अभिनेता कमल हसन यांच्या एका विधानाला विवाद्य ठरवून हिंदू दहशतवादाचा वाद नाकारणार्‍यांना हिंदू समाजातील अशा अनिष्ट प्रथा दहशतवादी वाटत नाहीत का? असे प्रकार समजल्यावर तरी धर्मातील अनिष्ट रुढींचे उच्चाटन करण्याचा कार्यक्रम समाजात रचनात्मक कार्य करणार्‍या सामाजिक संस्था हाती घेतील का? हिंदू धर्मातील या अनिष्ट परंपरा वा रुढी ठामपणे निकालात निघाल्याशिवाय हिंदू धर्माचा तेजस्वी अभिमान खरोखरच तेजस्वी ठरेल का?

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!