Type to search

अग्रलेख संपादकीय

हा तर मराठी अस्मितेचा पराभव!

Share

‘पुस्तकांचे गाव’ म्हणून महाबळेश्वर-पाचगणीजवळील भिलार गावाला सरकारने नवी ओळख दिली आहे. तेथे मराठीसोबतच इंग्रजी व गुजराती भाषेतील पुस्तकेसुद्धा उपलब्ध आहेत याबद्दल मराठी अभ्यास केंद्राच्या पदाधिकार्‍यांनी टीका केली आहे. ‘मराठी भाषेसाठी हा प्रकल्प उभारला गेला.

तिथे इतर भाषांची पुस्तके का ठेवली जावीत? इतर भाषांची पुस्तके भिलार गावात ठेवणे ही मराठी वाचनसंस्कृतीला दिलेली चालना आहे की पर्यटनाला?’ असे प्रश्न अभ्यास केंद्राने विचारले आहेत. मराठी भाषेची अस्मिता मराठी भाषकांनी जपलीच पाहिजे. तथापि इतर भाषांचा दु:स्वास करून मराठी भाषेची अस्मिता जपली जाते का? मराठीचे संवर्धन या द्वेषमूलक भूमिकेने होते का? की मराठी अस्मितेची संकुचितता जाहीर होते?

इतर भाषिकांना मराठी भाषेची व मराठी वाचकांना इतर भाषांतील साहित्याची ओळख करून घ्यावी असे वाटत असेल तर? त्यांना मनाई करण्यात काय अर्थ आहे? महाराष्ट्राला संतांचा समृद्ध वारसा लाभला आहे. संत नामदेवांनी पंजाबी भाषेत अभंग लिहिले. संत ज्ञानेश्वरांनी ‘हे विश्वचि माझे घर’ असे सांगून विश्वबंधुत्वाचा पुरस्कार आठ शतकांपूर्वी केला. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असे सर्वांसाठी ‘पसायदान’ ज्ञानेश्वरांनी मागितले त्या महाराष्ट्रात आज ही संकुचितता का वाढावी? भिलार हे महाबळेश्वर तालुक्यात आहे.

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण आहे. म्हणून तेथे फक्त मराठी पर्यटकांनीच यावे, असा आग्रह कोणी धरल्यास तो महाराष्ट्राची शोभा वाढविल का? महाराष्ट्रात कोसागणिक भाषा बदलते, असा वाक्प्रचार आहे. मराठीच्या पासष्टपेक्षा जास्त बोलीभाषा प्रचारात आहेत. ज्यांची बोलीभाषा मराठीपेक्षा वेगळी आहे अशा मुलांना प्रमाण मराठी भाषेतून शिकणे अडचणीचे ठरते हे लक्षात आल्यानंतर सरकारने त्यांच्या बोलीभाषेत पुस्तके तयार करायला सुरुवात केली आहे. मग तोही मराठी भाषेवर अन्याय मानायचा का? मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी बहुभाषिक पुस्तके ठेवण्यामागची शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

महाबळेश्वर-पाचगणीला बहुभाषक पर्यटक येतात. त्यांच्या मागणीनुसार ही पुस्तके ठेवल्याचा खुलासा गगराणी यांनी केला आहे. महाराष्ट्रात हजारो मुली आजही ‘नकोशा’ आहेत. अनेक जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर घटला आहे. पुरेशा पटसंख्येअभावी मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी अस्मिता टिकवण्यासाठी अशा अनेक क्षेत्रांत काम करणार्‍या सेवाभावी मंडळीची गरज आहे. ते न करता केवळ इतर भाषांतील पुस्तके ठेवल्याने मराठी भाषेवर अन्याय होतो, अशी ओरड करणे या प्रचारकी सेवाभावाने काय साध्य होणार? किंबहुना हा मराठी माणसाचा न्यूनगंड उघड करणारे पाऊल ठरत नाही का?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!