हवाला कोणाचा?

0

26 लाख पोलिसांच्या ताब्यात , ख्रिस्त गल्लीतील दोघांना अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरातील माळीवाडा भागातील सहकारनगर येथे पोलिसांनी हवाल्याची 26 लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली असून दोघांची चौकशी सुरू केली आहे. प्रविण रणसिंग सोळंकी व अजय उर्फ पिंटू देवेंद्र सोळंकी (रा. गुजरात, हल्ली रा. ख्रिस्तगल्ली) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर कलम 41 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. हवाल्याची रक्कम हस्तगत करताना झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. बुधवारी रात्री माळीवाडा भागात ही घटना घडली.

नगरमध्ये 26 लाखांची हवाला रक्कम जप्त, दोघांना अटक

लाखो रुपयांचा हवाला रक्कम दोघेजण घेऊन जाणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना मिळाली. ही माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक अभय परमार यांना कळविली. परमार यांनी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर परिसरात रात्री सापळा रचला. दोघेजण खाकी रंगाची पैशाची बॅग घेऊन जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवित कोठे जात आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिले. पिशवित काय आहे अशी विचारणा करताच दोघांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत त्यांना पकडले. त्यातील एकाला पकडत असताना एका पोलीस कर्मचार्‍याच्या बोटाला जखम झाली तरीही त्या पोलिसाने हवाला संशयिताला सोडले नाही. मुद्देमालासह दोघांना रात्री पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ही रक्कम कोठून आणली, कोणाची आहे, कोठे चालवली आहे, याबाबत विचारणा केली असता आरोपींनी सांगण्यास टाळाटाळ केली.
दरम्यान ही घटना राजकीय व्यक्तींना समजताच त्यांचे काही कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. रात्री पोलिसांनी पैसे मोजण्याचे मशिन आणून रक्कम मोजल्यानंतर ती 26 लाखा असल्याचे स्पष्ट झाले. कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी दोन्ही आरोपींना समज देण्यात आली. या रकमेचे विवरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी ज्या ठिकाणी 26 लाख रुपयांचा हवाला रक्कम पकडली, त्याच ठिकाणी यापूर्वी 98 लाखाची हवाला रक्कम पकडली होती. त्यामुळे माळीवाडा परिसरातील हा रस्ता हवालापॉईंट ठरू पाहत आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींना समज देऊन त्यांच्यावर 41 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. ही रक्कम कोठून आली, ती योग्य मार्गाची आहे याचा पुरावा द्यावा लागेल. त्यासाठी हे प्रकरण न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. आरोपींनी 26 लाख रुपायांचा योग्य विनियोग दाखविला तर ती रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार परत करण्यात येईल. अन्यथा दोघांवर पुढील कारवाई करण्यात येईल.
– अभय परमार,पोलीस निरीक्षक.

हवाला कारवाईतील वास्तव
शहरात व्यापारी हवाला माध्यामातून गुजरातमधील व्यापार्‍यांना रक्कम पाठविता. पोलीस कारवाई झाल्यानंतर व्यापार्‍यांना समज देऊन रकमेचे विवरण सादर करण्याचे आदेश दिले जातात. व्यापार असल्यामुळे अगदी सहजरित्या या रकमेच्या पावत्या न्यायालयात जाम केल्या जातात व रक्कम परत मिळते. पोलिसांना फक्त कागदी घोडे नाचवावे लागतात. शिक्षा मात्र शून्य होते. काही अधिकार्‍यांना हा फंडा माहित असल्याने ते कारवाईकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच शहरात हवाला रॅकेट विस्तारत आहे. 

 

LEAVE A REPLY

*