हळदी कुंकवाचे शिल्लक वाण घरी नेल्याने वाद

0

येवला । दि. 16 प्रतिनिधी
नगरपालिकेत हळदी कुंकू कार्यक्रमात वाण वाटप करताना भेदभाव झाला व एका नगरसेविकेने उरलेले वाण घरी घेउन गेल्याचा आरोप करीत घरी नेलेले वाण परत घेउन येण्यास सांगा, अशी मागणी करीत झाल्या प्रकाराचा जाब नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांना विचारत वाद घालण्यात आला.

गुरुवारी सकाळी अकरा वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच शिवसेना नगरसेविका व महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा सरोजिनी वखारे यांनी काल बुधवार दि. 15 मार्च रोजी झालेल्या हळदी कुंकवाच्या वाण वाटप कार्यक्रमात महिलांच्या ओळखी पाहून वस्तू वाटप करीत भेदभाव झाल्याचा व एका सत्ताधारी नगरसेविकेने उरलेले वाणाच्या वस्तू परस्पर घरी घेऊन गेल्याचा आरोप करीत नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांना याप्रकाराबाबत सवाल केला.

अपक्ष नगरसेवक रुपेश लोणारी यांनीही उरलेले वाण वस्तू घरी घेऊन जाणार्‍या संबंधित नगरसेविकांनी ते नगरपालिकेत परत आणुन देण्याची मागणी केली. नगराध्यक्ष क्षिरसागर व उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांच्या उपस्थितीत सुमारे दोन अडीच तास चाललेल्या या सर्वसाधारण सभेत 51 विविध विषयांना मंजूरी देण्यात आली.

प्रधानमंत्री आवासयोजनेत सहभागी होणे, नविन अग्निशमन वाहन खरेदी, जुन्या मुतार्‍या व शौचालय तोडून नविन बांधणे पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचा आढावा घेणे, अत्याधुनिक शोषखड्डा वापरणे, पे एन्ड युज शौचालय मोफत करणे, विंचुर चौफुली फत्तेबुरुज नाका, गंगादरवाजा येथे वाहतुक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा बसविणे, तसेच या ठिकाणी भुयारी मार्ग व स्कायवॉक तयार करणे, एटिएमद्वारे शुध्द पाणीपुरवठा करणेसाठी आलेला प्रस्ताव मंजूर करणे, नगरपालिकेकडून वैकुंठरथ सुविधा देणे, सेनापती तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी आरक्षण क्र. 7 मध्ये बदल करणे, सिनियर डिविजन न्यायालय चालू करणे यासह विविध विषयांना व वेळेवरील विषयांना यावेळी मंजूरी देण्यात आली.

मनमाड कोपरगाव टोल कंपनीने येवला नगरपालिका हद्दीत उभारलेले विद्युत पोल न. पा. कडे हस्तांतरित करून त्यावरील लाईट चालू करण्याच्या ठरावाला नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. या रस्त्यावरून टोल वसूल करणारी टोल कंपनी आपली जबाबदारी झटकून नगरपालिकेच्या गळ्यात हे स्ट्रिटलाईट टाकीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. तसेच शहरातील विस्थापित गाळेधारकांना पालकमंत्री गिरिश महाजन यांनी दिलेले आश्वासन पुर्तता करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेता डॉ. संकेत शिंदे यांनी केली.

नगरपालिका निवडणुकीमध्ये पालकमंत्र्यांनी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवरील निर्णयानुसार नगरपालिकेने राबविलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत उध्वस्त झालेल्या गाळेधारकांचे पुर्नवसन त्याच ठिकाणी बांधलेल्या व्यापारी संकुलात करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

डॉ. शिंदे यांनी केंद्रात, राज्यात व शहरात भाजपची सत्ता असल्याचे सांगत आता नगराध्यक्षांनी पालकमंत्री महाजन यांच्यासमवेत गाळेधारकांची बैठक लावून आधी विस्थापित गाळे धारकांना न्याय द्या मगच लिलाव प्रक्रिया राबवा अशी मागणी केली.

अपक्ष नगरसेवक रुपेश लोणारी यांनी 2000 साली लातूर येथे विस्थापित गाळेधारकांचे पुर्नवसन करण्यात आले त्या पध्दतीने लातूर पॅटर्न येवल्यात राबवीत गाळेवाटप करून विस्थापितांना नियमांचे पालन करीत न्याय देण्याची मागणी केली. या सर्वसाधारण सभेला सर्व नगरसेवकांसह मुख्याधिकारी राहुल वाघ व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*