हल्ले रोखण्यासाठी डॉक्टरांनीच आचारसंहिता ठरवावी – जिल्हाधिकारी

0

जळगाव | प्रतिनिधी :  क्रिटीकल रुग्णाबाबत सरकारी व खाजगी रुग्णालांनी पोलिसांना माहिती दिली पाहिजे. तसेच बीलासंदर्भातही पारदर्शकता ठेवून सुरक्षिततेसंबंधीच्या सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे. हल्ले रोखण्यासाठी डॉक्टरांनीच स्वतः आचारसंहिता ठरवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आज येथे केले.

दरम्यान जिल्ह्यातील कार्यरत डॉक्टरांची यादी मागवून त्यातील बोगस डॉक्टर शोधण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांनी आयएमएवर सोपवली आहे.

धुळे येथे डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज आयएमएतर्फे निषेध बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, आयुक्त जीवन सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील भामरे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, म्हैसाळच्या घटनेनंतर शासनस्तरावर बैठक झाली. त्यानुसार दि. १५ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत तपासणी मोहीम घेण्याच आदेश मिळाले आहेत. या तपासणी मोहीमेत कुणावरही अन्याय होणार नाही. परंतु जो दोषी आढळुन येईल त्यावर आयएमए, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्यचिकीत्सक, जि.प. सीईओ यांच्याशी चर्चेनंतरच कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

बोगस डॉक्टर्स शोधण्याची जबाबदारी आयएमएवर

जिल्ह्यातील कार्यरत डॉक्टरांची यंत्रणांकडुन माहिती मागविली जाणार आहे. ही डॉक्टरांची यादी आयएमएकडे दिली जाईल. आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी यादीची छाननी करून बोगस डॉक्टरांची माहिती दिल्यास संबंधीतांवर कारवाई केली जाईल असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. तसेच शहरातील कार्यरत डॉक्टरांची नोंदणी महापालिकेकडे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

रूग्णांची माहिती पोलीसांना कळवा

एखादा रूग्ण क्रिटीकल किंवा व्हीआयपी असेल अशांची माहिती रूग्णालयांनी पोलीसांना कळविली पाहीजे. तसेच बिलासंदर्भातही आचारसंहीता ठरवली गेली पाहीजे. रूग्णांशी डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी चांगला संवाद साधल्यास हल्ल्यांना प्रतिबंध करता येईल.

जिल्ह्यातील डॉक्टरांनी व्हॉट्स ऍप गृप तयार करून त्यात पोलीसांनाही सहभागी करून घ्यावे. सीसीटीव्ही यंत्रणा कायम कार्यान्वीत ठेवावी, रूग्णांच्या नातेवाईकांना रूग्णावर सुरू असलेल्या उपचाराची संपुर्ण माहीती दिली जावी अशा सुचनाही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी केल्या.

गर्भपाताची माहीती घेणार

जिल्ह्यात आत्तापर्यंत झालेल्या गर्भपातांची माहीती घेतली जाणार असुन त्यासंबंधी योग्य ती पाऊले उचलली जातील असेही जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले.

सिव्हीलमध्ये आजपासुन सुरक्षा वाढणार

जिल्ह्यात डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण कमी असले तरी काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णालयात पोलिस पाच ते दहा मिनीटात पोहचतील अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उद्या दि.१८ पासून महिला पोलिसांसह सुरक्षा वाढविणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.

डॉक्टरांनी देखील गोंधळ घालणार्‍या सराईत लोकांची नावे आमच्याकडे द्यावी, तसेच रुग्णांशी चांगला संवाद ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ.अनिल खडके, डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.विलास भोळे यांनी विविध प्रश्‍न मांडले. आयएमएचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ.विलास भोळे तर आभार डॉ.स्नेहल फेगडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*