हम भी कुछ कम नही – एसटी वर्कशॉपमध्ये काम करुन सिमा पाटील यांनी पुरुष मेकॅनिकलची मोडीत काढली धारणा

0

अमोल कासार | जळगाव :  विवाहनंतर आठ वर्षाने एसटी महामंडळात नोकरी लागली. मेकॅनिकलचे काम केवळ पुरुषच करु शकतात. अशी समाजामध्ये धारणा आहे. परंतु धरणगाव तालुक्यातील पिंप्री भोद खुर्द येथील सिमा पाटील यांनी ही धारणा मोडीत काढली. जळगाव एसटी आगाराच्या वर्कशॉपमध्ये बस दुरुस्तीचे काम अतिशय सक्षमपणे आणि यशस्वीपणे करीत आहेत.

एसटी वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या सिमा पाटील यांनी दहावीनंतर आयटीआयचे शिक्षण घेतले. त्यांचे आठ वर्षांपुर्वी धरणगाव तालुक्यातील प्रिंप्री भोद खुर्द येथील दिनकर पाटील यांच्यांशी विवाह झाला.

शिक्षणाची आवड व शिकण्याची जिद्द न सोडता त्यांनी एटी महामंडळाच्या वर्कशॉपमधील मॅकनिकल विभागात दोन वर्षापूर्वी एसटी दुरुस्तीची नोकरी स्विकारली. २८ किलोमीटरचा प्रवास करुन त्या दररोज सकाळी ७.३० वाजेला कामावर हजर होत असतात. मॅकेनिकल विभागात काम करतांना सुरुवातीला त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

तसेच त्याठिकाणी असलेल्या अवजड काम करतांना त्यांच्या सोबत अनेक छोटे मोठे अपघात झाल्याने त्यांना हे काम नकोसे वाटत होते. नातेवाईक ही नोकरी सोडून दे असे सांगायचे परंतु सौ. पाटील यांना मॅकेनिकच्या कामाबद्दल आवड निर्माण झाली. अतिशय कठीण असलेले काम अगदी सहजतेने त्या करीत आहेत.

दैनंदिन कामात त्या पुरुषाच्या बरोबरीने ‘हम भी कुछ कम नही’ असे म्हणत एसटी मधील स्प्रिंग बदल करणे, गेअर बॉक्स बदलणे, गाड्यांची ऑईलिंग करणे यासह बसेसचे टायर बदलणे यासह अनेक प्रकारची अवजड कामे त्या पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून करीत आहेत. आता हे काम करतांना एक वेगळाच आनंद मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे आता त्या मॅकेनिकलच्या कामात पारंगत झाल्या असून दुरुस्तीसाठी आलेली एसटी त्या स्वत: चालवून त्याचे संपूर्ण काम या करीत असतात. अतिशय अवघड असलेले काम आपल्या हातून होत असल्यामुळे कामात समाधान मिळत असल्याचेही सिमा पाटील यांनी सांगितले.

वर्कशॉपमध्ये काम करीत असतांना अनेक अडचणी येतात, अनेक आव्हाणांनाही सामोरे जावे लागते. परंतु त्यासाठी कुटूंबियांचा आधार मिळत असल्याने अवघड असलेले कामही सोपे वाटत असल्याचे सिमा पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*