Type to search

ब्लॉग

‘हगिबिस’चा जगाला धडा

Share

जपानमध्ये झालेल्या हगिबिस वादळाने पुन्हा एकदा जागतिक तापमानवाढीचा आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.
जपानमध्ये याचा वेळीच इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मदतकार्यही तत्परतेने सुरू झाले. तरीही या भूकंपप्रवण देशात या चक्रीवादळाने अक्षरशः हाहाकार उडवून दिला. टोकिओलाच याचा फटका बसल्याने कामाला आत्यंतिक महत्त्व देणार्‍या जपानी उद्योजकांना आणि व्यावसायिकांना मोठा तडाखा बसला आहे. त्याबरोबरच हजारो विमान उड्डाणे रद्द केल्यामुळे आणि राजधानीतले अनेक व्यवहार थंडावल्यामुळे राष्ट्रीय अर्थकारणालाही झळ पोहोचली.

आतापर्यंत जागतिक
तापमानवाढीकडे आणि पर्यावरणाच्या हानीकडे फारसे लक्ष न देणार्‍या जपानी नेत्यांनी नैसर्गिक आपत्तींमुळे जीवित आणि वित्त या दोन्ही पातळ्यांवरील वाढत्या हानीमुळे अलीकडे याची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. आमच्याकडे भूकंप सततच होतात, ज्वालामुखीच्या उद्रेकांचीही आम्हाला सवय आहे. हा आमच्या अतिऔद्योगिकरणाचा परिणाम नाही, असे आपले पूर्वीचे म्हणणे तपासण्याची गरज त्यांना वाटू लागली आहे, कारण अलीकडे भूकंपांची तीव्रता तर वाढली आहेच शिवाय वादळांनीही मोठी भर घालण्यास सुरुवात केली आहे. हगिबिस चक्रीवादळासोबत झालेल्या विक्रमी मुसळधार पावसाने टोकिओला झोडपले. त्यामुळे नद्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झालाच पण समुद्रकिनारेही धोक्यात आले. ताशी दोनशे किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. मध्य आणि ईशान्य भागातल्या नद्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला. सरकारने किनारपट्टी आणि नद्यांजवळ राहणार्‍या हजारो नागरिकांचे स्थलांतर केले.

याखेरीज एकट्या रविवारीच (13 ऑक्टोबरला) दोन हजार विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. एक लाख घरांमधली वीज गायब झाली. जपानमधल्या नैसर्गिक आपत्तीमधून काही बाबी समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे टोकिओतली पूरनियंत्रण यंत्रणा अत्यंत सक्षम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे एवढ्या प्रचंड आपत्तीमुळेही टोकिओत तुलनेत अल्प नुकसान झालेे. मात्र तरीही होंशूपासून पश्चिमेकडे मिएपर्यंत आणि उत्तरेकडे ईवातेपर्यंत म्हणजेच सुमारे युकेएवढ्या क्षेत्रफळाच्या परिसराची मोठी हानी झाली आहे. नागानो परिसरात सर्वात भयंकर महापूर आला. हा परिसर पर्वतीय प्रदेशातला दुर्गम भाग आहे. तिथे नेहमीच हिमवर्षावाची चिंता भेडसावते. त्यातच यंदा या वादळाची भर पडली.

पर्यावरणतज्ञांना चिंता वाटण्याजोगी बाब म्हणजे हगिबिसची व्याप्ती आणि हानिकारकता नेहमीच्या तुलनेत प्रचंड राहिलीच, परंतु ते नेहमीपेक्षा खूपच उशिरा आलेे. सहसा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जपानमध्ये काही चक्रीवादळे येतात. परंतु अलीकडच्या काळात हा कालावधी लांबत चालला असून वादळांची तीव्रताही वाढत चालली आहे. यासंदर्भात 2015 मध्ये तिथे एक संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यानुसार 1970 च्या उत्तरार्धापासूनच पूर्व आशियाच्या किनारपट्ट्यांना तडाखा देणारी चक्रीवादळे अधिकाधिक शक्तिशाली बनत चालली आहेत. टोकिओची आपत्ती निवारण यंत्रणा अत्यंत सुसज्ज असली तरी त्याच्या आग्नेय भागात सुमारे 4 फूट उंच पाणी साचले आहे. किनारपट्ट्यांवर सुमारे 42 फूट उंचीच्या लाटा उसळल्या. गेल्याच महिन्यात चिबा परिसरात झालेल्या चक्रीवादळा मुळे भयंकर नुकसान झाले होते.

महापुरासारख्या आपत्तींमध्ये वाढ होऊन प्रमुख नैसर्गिक परिसंस्थांंची मोठी हानी होईल, असाही धोका वर्तवण्यात आला आहे.जपानमध्ये गेल्या साठ वर्षांतील सर्वाधिक शक्तिशाली ‘हगिबिस’ नावाच्या चक्रीवादळाने थैमान घातले आहे. त्याचा फटका जपानच्या राजधानीला बसला आहे. अनेक जणांचा त्यात मृत्यू झाला. कित्येक लोक जखमी झाले. या वादळाने जगाला धडा शिकवला आहे.
उर्मिला राजोपाध्ये

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!