हगणदारीमुक्तीसाठी कंबर कसली!

जि. प. अधिकार्‍यांवर ग्रामस्थ मानसिकता बदलण्याची जबाबदारी

0

नाशिक | दि. ८ प्रतिनिधी- जिल्ह्यातील हगणदारीमुक्तीसाठी ज्या-ज्या तालुक्यांना स्वच्छ भारत अभियानांतर्गत लक्ष्यांक देण्यात आला होता त्यापैकी मालेगाव तालुक्यातील हगणदारीमुक्तीत सुमारे ४४ खेडे मागे पडली होती. येथील प्रत्येक गावाची जबाबदारी जि.प. अधिकार्‍यांवर सोपवून उपक्रमात ग्रामस्थांचे मन वळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य हगणदारीमुक्ती अभियानात इतर राज्यांच्या पुढे असते जर मालेगाव तालुक्यातील ४४ गावांनी हगणदारीमुक्तीत उत्स्फूर्त सहभाग घेतला असता. पण जेव्हा राज्याचा आढावा घेण्यात आला तेव्हा राज्यातील प्रत्येक तालुक्यांनी दिलेल्या लक्ष्यांक गाठण्याचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच पूर्ण केले आहे.

मात्र मालेगावमधील ४४ गावे मागे पडलेली होती, असे आढावा बैठकीत आढळून आले होते. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना याबाबत विचारणा केली होती. मालेगाव तालुक्यात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात जिल्हा परिषद कशी काय मागे पडली, अशी विचारणा करण्यात आली होती.

ज्यावेळी सीईओंनी तालुक्याचा आढावा घेतला तेव्हा सुमारे ४४ गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास बसणार्‍यांची संख्या सर्वाधिक आढळून आली होती. ग्रामस्थांनी घरोघरी शौचालय बांधण्यावर लक्ष दिले नाही. त्याचबरोबर ज्यांनी घरात शौचालय बांधले होते ते त्याचा उपयोग करत नव्हते.

त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ऐन निवडणूक कालावधीत जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांना प्रत्येकी चार गावांची जबाबदारी सोपवून कामाला लावले होते. त्यामुळे गत दीड-दोन महिन्यांपासून मालेगाव तालुक्यात सकाळी-सकाळी गुड मॉर्निंेग पथक, जनजागृती, टमरेल जप्त कारवाई असे उपक्रम राबवून ग्रामस्थांची उघड्यावर शौचास बसण्याची मनोवृत्ती बदलण्याची मोहीम सुरू आहे.

मालेगावच्या ज्या गावांमध्ये उघड्यावर शौचास बसण्याची प्रवृत्ती अधिक आहे अशा गावांमध्ये आता धडक मोहीम राबवण्याची आणि प्रतिबंधक कारवाई करण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे. कारण मार्चनंतर राज्याला त्याचा आढावा सादर करण्याचे उद्दिष्ट्य जि.प. समोर आहे.

‘टमरेल’ जप्ती मोहीम
मालेगावमध्ये ज्या गावांमध्ये मोहीम राबवण्यात येत आहे ती गावे प्रामुख्याने टंचाईग्रस्त आणि दुष्काळी भागात मोडतात. त्यामुळे येथील ग्रामस्थांना शौचालय बांधून त्याचा वापर करण्याची सवय लावण्यासाठी त्यांची मनोवृत्ती बदलण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली आहे. त्यामुळे जागृती, समजून सांगणे, आता कारवाई करण्याचे पाऊल प्रशासनाने उचलेले आहे. सकाळी-सकाळी अधिकार्‍यांनी पथकांसह गावांमध्ये धडक देत उघड्यावर शौचास जाणार्‍यांचे पाण्याचे डबे असलेले ‘टमरेल’ जप्त करणे सुरू केले आहे. त्याचबरोबर दंड आकारणीचे अस्त्र उगारण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सार्वजनिक ठिकाणी आणि गावातील मोकळ्या जागेत उघड्यावर शौचास जाण्याचे टाळले तर कारवाईही टळेल.

LEAVE A REPLY

*