स्वेदन अर्थात वाफ घेणे

0

He who sweats, get more out of life अशी म्हण आहे. आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी प्रत्येकाला घाम गाळावा लागतो हे सर्व कर्तृत्ववान व्यक्तींकडे बघितले म्हणजे कळते. परंतु घाम गाळणे हा उपचार, चिकित्सा पद्धती होय, असे आयुर्वेदाचे मत आहे.

पंचकर्मापूर्वी वाफ करणे हे पूर्व कर्म होय. तसेच बर्‍याच वातादी विकारांमध्येसुद्धा वाफ दिली जाते. वमन अथवा विरेचनापूर्वी सर्वांगाभ्यंग करून स्वेदनपेटी (वाफ देण्याकरिताच्या विशिष्ट यंत्र, बॉक्स) मध्ये बसवून अथवा झोपवून वाफ दिली जाते. बस्तीपूर्वी पोट, कंबर, पाय या अवयवांना तेल लावून नाडीस्वेद (नळीच्या सहाय्याने बाहेरून) वाफ दिली जाते. तर नस्याकरिता चेहरा, मान, खांदा यांना तेल लावून डोळ्यांवर पट्टी बांधून नाडीस्वेद दिला जातो.

दमा, खोकला, सर्दी, गळा खराब होणे या आजारांमध्ये छातीला, पाठीला तेल लावून नाडीस्वेद दिला जातो. अंग दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे, गुडघा दुखणे, खांदा दुखणे, टाच दुखणे या वाताच्या विकारांमध्येसुद्धा वाफ देणे हा उत्तम उपाय होय.

बॉक्समध्ये वाफ देण्यासाठी त्या साईजची पेटी वा बॉक्स आवश्यक आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार बसण्याची वा झोपण्याची पेटी बनवावी. रुग्णाला सर्वांगाला अभ्यंग करून स्वेदन पेटीमध्ये बसवावे वा झोपवावे. आतमध्ये जाताना अंगावर केवळ अंडरपँट असते. आपल्या इंद्रियाचा भाग हा झाकलेला असावा. त्याला डायरेक्ट वाफ लागता कामा नये. यासाठी ही काळजी. सर्वांगाला घाम सुरू झाला, धारा वाहू लागल्या म्हणजे रुग्णाच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागतात तेव्हा समजावे की घाम योग्य प्रमाणात झाला. वाफ किती वेळेपर्यंत द्यावी याचे प्रमाण हे ऋतू, प्रकृती यावर अवलंबून असते. जसे की उन्हाळ्यात दुपारच्या वेळी, पित्त प्रकृतीच्या लोकांना, भूक लागलेली असताना लवकर घाम येतो तर हिवाळ्यात सकाळच्या वेळी कफ प्रकृतीच्या लोकांना घाम यायला तुलनेत अधिक वेळ लागतो. चेहर्‍यावर घाम दिसू लागला म्हणजे आपण समजावे स्वेदन योग्य झाले. त्यानंतर रुग्णाला बाहेर काढून अंग पुसायला सांगणे. यानंतर रुग्णाने 20 ते 30 मिनिटे एकदम हवेत जाऊ नये अथवा पंख्याच्या हवेत बसू नये. अशा तर्‍हेने 1-3 दिवस वाफ दिली जाते. नेमके दिवस डॉक्टर ठरवतात. स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी वाफ देऊ नये.

चेहर्‍याला वाफ देण्यापूर्वी चेहर्‍याला तेल लावून पूर्ण डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. डोळे हा नाजूक अवयव असल्यामुळे त्याची उष्णतेपासून काळजी घेणे आवश्यक असते. इथेसुद्धा चेहर्‍यावर घामाची लव, ओलावा जाणवू लागताच स्वेदन थांबवावे. अगदी घाम निथळेपर्यंत वाट बघू नये. नस्यापूर्वी सर्दी, सायनुसायटीस आदी विकारांमध्ये चेहर्‍याला वाफ देता येते.

छाती, पाठीला वाफ देण्यासाठी तेथे प्रथम तेल लावावे नंतर नाडीस्वेद करावा. छातीला वाफ देताना हृदयाला जास्त वाफ देऊ नये. पाठीला मात्र तेवढी काळजी करण्याचे कारण नाही. मान अवघडली असल्यास खोकला, दमा, पाठदुखी यामध्ये याचा वापर करावा. हाताचे वा पायाचे जे सांधे दुखत असतील अशा ठिकाणी तेल लावून बाहेरून वाफ द्यावी. काही वाताच्या आजारांमध्ये मात्र तेल लावण्याने सूज वा अवघडलेपणा वाढतो. अशावेळी वाफेने वा बरेच वेळा वाळू गरम करून ती पुरचुंडीमध्ये बांधून तिने शेक करावा. याला रुक्षस्वेद म्हणतात.

लघवीला दुखणे, मूतखड्यामुळे दुखणे, लघवी अडणे अशा आजारांमध्ये कमरेच्या भागाला तेल लावून टबमध्ये बसवले जाते. ज्यात रुग्णाचे पाय बाहेर असतात. केवळ कंबरेचा भाग पाण्यामध्ये डुंबलेला असतो, त्याला अवगाह स्वेद म्हणतात. या अवगाह स्वेदामध्ये दशमूळसारख्या औषधांचा काढासुद्धा वापरला जातो. नाडीस्वेद अथवा पेटीस्वेदनासाठी 10 लिटरचा कुकर वापरतात. त्यामध्ये आवश्यकतेनुसार म्हणजे 1-2 लिटर पाणी टाकतात. दशमूळ, एरंड पाने, काटेकोरंटींचे पान, शेवग्याची पाने, रुईची पाने, निर्गुडीची पाने यातील जी औषधे उपलब्ध असतील ती 50-100 ग्रॅम घेऊन एका पुरचुंडीमध्ये बांधून ती पुरचुंडी पाण्यात टाकावी.

पाणी उकळण्यासोबत औषधी+पाण्याची वाफ तयार होते. कुकरच्या वरील शिटी काढून त्या ठिकाणी रबरी नळी वापरावी. त्या नळीच्या माध्यमातून कुकरमधील वाफ बाहेर येईल. ही नळी पेटीमध्ये सोडली की पेटीमध्ये वाफ जमा होईल. याच नळीने डायरेक्ट वाफ दिल्यास तो नाडीस्वेद होतो. बॉक्समध्ये एखाद्यावेळी चुकून रुग्णाला अधिक वाफ होऊ शकते. जास्त स्वेदनामुळे पित्त वाढणे, रक्त दूषित होणे, तहान लागणे, चक्कर येणे, आवाज क्षीण होणे, अंग दुखणे, सांधे दुखणे, ताप, अंगावर पांढरे लाल चट्टे उमटणे, उलटी दाह होणे, थकवा येणे, घाम येतच राहणे, दुर्बलता अशी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. अशावेळी रुग्णाच्या अंगावर प्रथमत:

थंड पाणी टाकावे. पंख्याच्या गार हवेत बसवावे. अधिक काळजी करण्यासारखे असल्यास कशरव श्रेु िेीळींळेप देऊन डॉक्टरांच्या सहाय्याने अन्य उपचार करावेत. स्वेदनाच्या वेळी रुग्णांना भूक लागलेली नसावी तसेच त्याचे पोट भरलेलेसुद्धा नसावे. अतिस्थूल, ज्यांची त्वचा अगदी कोरडी वाटते अशांना दुर्बलता, चक्कर येत असताना, मद्यपान करणार्‍यांना, नागीणच्या रुग्णांना, नुकतेच ज्यांनी दूध, दही, तूप, मध घेतलेले आहे व ज्यांनी जुलाब घेतलेले आहेत, राग, शोक, भय, तहान, भूक यांनी पीडित असताना, नवीन मधुमेह या आजारात तसेच गर्भवती, पाळी आलेल्या, बाळंतीण स्त्रियांना वाफ देऊ नये.
अर्चना तोंडे 

LEAVE A REPLY

*